सून अपक्ष उभी राहिली,परंतू भाजपने जिल्हा उपाध्यक्ष तिच्या सासऱ्यांवरच कारवाई केली
उत्तम कुटे
पिंपरीःराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर (ता.आंबेगाव)नगरपंचायतीत त्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली असून राज्याच्या सत्तेतील शिवसेना,मात्र स्वतंत्र लढत आहे.युतीत बंडखोरी केली म्हणून भाजपने तेथील आपले बंडखोर उमेदवार आणि त्यांचा प्रचार करणारे पदाधिकारी अशा आठजणांना घरचा रस्ता शनिवारी (ता.२८) दाखवला.पदाधिकाऱ्यांना पदावरून निलंबित केले.शिवाय त्यांच्यासह इतर सर्वांचे पक्ष सदस्यत्वही भाजपने रद्द केल्याची मोठी धाडसी कारवाई केली.दरम्यान,युतीतील एका पक्षाने (भाजप)ही कडक कारवाई केल्यानंतर दुसरा पक्षही (राष्ट्रवादी) ती आपल्या बंडखोरांवर करणार का,याकडे मंचरकरांचे आता लक्ष लागले आहेे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार उत्तर पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ही शिस्तभंगाची कारवाई केली.
पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात,त्यांची सून प्राची थोरात,जयेश निर्हाळी,मंडलाध्यक्षा स्नेहल चासकर,प्रमिला निर्हाळी, संजय बाणखेले,युवा मोर्चा मंडलाध्यक्ष नवनाथ थोरात आणि कालिदास वांजळे अशी ही कारवाई झालेल्यांची नावे आहेत.मात्र,ती चुकीची असल्याचा दावा संजय थोरात यांनी आपला आवाज शी बोलताना केला.ती चुकीची कशी आहे याचे दुसरे उदाहऱण त्यांनी दिले.अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले जयेश निर्हाळी यांच्याबरोबर त्यांची पत्नी प्रमिला यांच्यावर सुद्धा हा कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.धनेश बाणखेले हे पक्षाचा उमेदवार नसलेल्या ठिकाणी अपक्ष उभे आहेत,असे ते म्हणाले.स्नेहल चासकर आणि नवनाथ थोरात हे उमेदवार नाहीत,तरी त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले.तर,बंडखोरांचा प्रचार केला म्हणून पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई केल्याचे कंद यांनी सांगितले.
मंचर नगरपंचायत निवडणुकीचे भाजपचे पक्ष प्रभारी डॉ.ताराचंद कराळे यांच्या सांगण्यांनुसार ही कारवाई झाल्याचा आरोप संजय थोरात यांनी केला.त्यांना भाजप संपवाय़चा असून राष्ट्रवादीचे एजंट ठेवाय़चे आहेत,अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. सून प्राची ही भाजपचा उमेदवार नसलेल्या ठिकाणी अपक्ष म्हणून रिंगणात असून ती भाजपची सदस्य नसून सुद्धा तिच्यासह आपल्यावर करण्यात आलेली ही कारवाई चुकीची असल्याचा दावा थोरात यांनी केला.दरम्यान,मंचर येथे तीन प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रसमध्येही बंडखोरी झाली असून त्यांच्यावर अशी कारवाई होते का,याकडे भाजपने ती केलेले बंडखोर अपक्ष उमेदवार, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांच्यासह मंचरकरांचेही लक्ष आता लागले आहे.

