पैसे वाटत असल्याच्या संशयातून दोन तरुणांना मारहाण,नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार शिवाजी मांदळे व साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद
उत्तम कुटे
पिंपरीःराजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी (३ डिसेंबर) मतदान असून प्रचार शेवटच्या टप्यात शिगेला पोचला आहे.तेथे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण असल्याने त्यासाठी मोठी चुरस असून बहूरंगी लढत होत आहे.परंतू,मुद्यांवरून ही निवडणूक काल (ता.२८)गुद्यांवर गेली.पैसे वाटत असल्याच्या संशयातून दोन तरुणांना नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार शिवाजी मांदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली.त्याबाबत खेड पोलिस ठाण्यात आज (ता.२९) मारहाणीचा गुन्हा मांदळे व साथीदारांविरुद्ध दाखल झाला.मात्र,अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे समजले.
शेवंता पार्क,तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर येथे काल रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली.त्याबााबत साई विलास पिंगळे (वय 20,रा.तिन्हेवाडी रोड, आयोध्यानगरी, सी विंग, फ्लॅट नं.12 राजगुरूनगर ता.खेड जि.पुणे) या नोकरदार तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या दाखल एफआयआर नुसार साई हा त्याच्या मोटारीतून (एमएच-12-एफएफ-1555) मित्र मोहित सुनिल कदमसह शेवंता पार्क सोसासटी,तिन्हेवाडी रोड येथे प्लॉटीग पहाण्यासाठी गेला होता.त्यावेळी मागून बाईकवरून मांदळे व त्यांचे सहकारी आले.त्यांनी साईच्या कारचा दरवाजा उघडून त्यांना हाताने मारहाण सुरु केली.यावेळी मांदळे यांनी मोहित कदम याला “तु पैशाची बॅग घेवुन पळाला का? अशी विचारणा केली.त्यावर माझ्या हातात पैशाची बॅग नसून दोन फोन असल्याचे मोहित म्हणाला. मांदळे हे प्रभाग नं.6 मधुन नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठीही उभे आहेत.आम्ही मतदारांना पैसे वाटण्यासाठी आल्याचा त्यांचा गैरसमज झाल्याने त्यांनी आम्हाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे साई याने तक्रारीत म्हटले आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक सिसोदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.दरम्यान,याबाबत काय कारवाई झाली,कोणाला अटक केली,घटनास्थळी पैशाची बॅग तथा पैसे मिळाले का हे जाणून घेण्यासाठी खेड पोलिस ठाण्याचे प्रमुख तथा पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.
