शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान
नारायणगाव – किरण वाजगे (कार्यकारी संपादक)
हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर येथील प्रशांत यशवंत वाघ यांच्या मालकीच्या १३ शेळ्या बिबट्या ने ठार केल्या तर दोन शेळ्या गंभीर जखमी केल्या असून यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८) रोजी मध्यरात्री बारा ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान घटनेची माहिती समजल्यावर वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तेथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.
दरम्यान हिवरे तर्फे नारायणगाव येथे प्रशांत वाघ यांचा शेळ्यांचा गोठा आहे यामध्ये सानेन जातीच्या शेळ्याचे त्यांनी शेळी पालन केले असून या शेळ्यांच्या संरक्षणासाठी पत्र्याचे मोठे शेड तयार केले असून या मुक्त गोठ्याला लोखंडी तारेचे ८ – १० फूट उंचीचे कंपाउंड केले आहे. प्रशांत वाघ व त्यांची वृद्ध आई या शेळ्यांचे संगोपन करत असतात. वाघ यांचा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत असल्याने त्याची आई व तो पुण्यात राहतो तर हिवरे या ठिकाणी प्रशांत वाघ व त्यांची वृद्ध आई राहत असतात. मुलाला व पत्नीला भेटण्यासाठी ते गुरुवारी पुण्याला गेले होते.
बिबट्या ने तेरा शेळ्या ठार केल्या असून दोन शेळ्या जखमी केल्याचा फोन त्यांना आल्यामुळे ते तत्काळ गावी आले त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला तातडीने कळवली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे तातडीने घटनास्थळी येऊन त्यांनी मृत शेळ्यांचा व जखमी शेळ्यांचा पंचनामा केला असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावला आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात अनेक शेतकऱ्यांनी तेथे गर्दी केली होती घटनास्थळी शिवसेना तालुकाप्रमुख योगेश पाटे, नंदू अडसरे,सुरज वाजगे, गणेश पाटे, नितीन भोर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या शेळ्यांवर एकट्या बिबट्याने हल्ला केला नसून तीन ते चार बिबट्यांची टोळी असल्यामुळे त्यांनी या १३ शेळ्या ठार केल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिबट्यांनी तीन शेळ्या जागेवर मारून टाकल्या आहेत तर दोन शेळ्या गंभीर जखमी केल्या व उर्वरित दहा शेळ्या बिबट्याने आठ फूट उंचीच्या लोखंडी जाळीवरून बाजूला असलेल्या उसामध्ये नेऊन ठार केल्या असल्याचा दावा श्री वाघ यांनी केला आहे. त्या ठिकाणी या शेळ्यांचे काही अवशेष वन खात्याच्या निदर्शनात आले आहेत.
याबाबत वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे म्हणाले की, या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या अधिक असून सूर्यास्तानंतर व सूर्यास्तापूर्वी शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करायला जाऊ नये तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना एकट्याने न जाता त्यांना पालकांनी शाळेत सोडावे व आणावे तसेच उसाच्या शेताच्या कडेने ये जा करताना एकट्याने न जाता सोबतीला जोडीदार घेऊन जावा अथवा मोबाईलमध्ये गाणी सुरू करावी व हातामध्ये काठी ठेवावी.
