पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

मॉक ड्रिल द्वारे कर्मचारी आणि नागरिकांना आपत्कालीन तयारीचे मार्गदर्शन

पिंपरी, (दि.१४) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचारी व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन केले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या अधिपत्याखाली उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन विभागाचे जवान, सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

गॅस लिकेज झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, परिसर तात्काळ रिकामा करण्याचे महत्त्व, अग्निशमन साधनांचा वापर करून आग लागल्यास तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीवितहानीपासून बचाव कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. अग्निशमन दलातील जवानांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे गॅस लिकेज ओळखण्याची चिन्हे, लहान व मोठ्या आगींचे प्रकार आणि विविध अग्निशामक उपकरणांचा योग्य वापर कसा करावा, हे दाखवून दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्राणरक्षण आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा मॉक ड्रिलमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग अशा उपक्रमांद्वारे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा संस्कार रुजवण्याचे कार्य करत असल्याचे प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी सांगितले.तर मॉक ड्रिलद्वारे नागरिक आणि संस्थांना प्रत्यक्ष सराव करून सज्ज ठेवणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी म्हटले आहे. दरम्यान या मॉक ड्रिलमुळे केंद्रामधील कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे मत
विकास नाईक, उपअग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी व्यक्त केले आहे.