“पत्रकबाजी नव्हे, शहर विकासाचा खरा मुद्दा विसरला”- भाजपचे सचिन काळभोर यांचा तुषार कामठे यांच्यावर निशाणा

“महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुषार कामठेंची पत्रकबाजी सुरू” असा भाजपचा आरोप

पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या भ्रष्टाचार, विकास आराखड्यातील व्यवहार, संशयास्पद निविदा आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली चाललेल्या गैरप्रकारांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अलीकडेच आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळातील भांडवली कामांची माहिती मागवली आहे. मात्र, या मागणीवरून शहरात नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे माजी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी या संदर्भात तुषार कामठे यांच्यावर तीव्र टीका केली असून,
“आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक असताना तुषार कामठे मुग गिळून गप्प बसले होते. आता निवडणुका जवळ आल्याने पत्रकबाजी करून नागरिकांना गोंधळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,”
असा आरोप त्यांनी केला आहे.
“गंभीर समस्यांवर तेव्हा मौन, आता पत्रकबाजी”
काळभोर यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांची उदाहरणे देत कामठे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की
“निगडी ते मोरवाडी सिग्नलदरम्यान मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली, २४ तास पाणीपुरवठा योजना अडथळ्यात आहे, रावेत बीआरटी मार्ग बंद आहे, आकुर्डीचा जलतरण तलाव वर्षभरापासून बंद आहे पण या सर्व विषयांवर तुषार कामठे एकदाही बोलले नाहीत.”
तसेच,
“रेड झोनमधील पुनर्वसन क्षेत्रात २५६ फोटोपास धारकांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्या विषयावरही त्यांनी भूमिका घेतली नाही,”
असे काळभोर यांनी नमूद केले.
“शरद पवार गटात गळती, म्हणून पत्रकबाजी”
काळभोर यांनी पुढे सांगितले की —
“भोसरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटात मोठी गळती लागली आहे. अजित गव्हाणे आणि २६ माजी नगरसेवक अजित पवार गटात दाखल झाले. त्यामुळे शरद पवार गट बचावासाठी पत्रकबाजीचा मार्ग अवलंबत आहे.”
“छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणातही मौन”
काळभोर म्हणाले —
“छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या पादुकांना तडे गेले तेव्हा कामठे आक्रमक झाले, पण ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रमादरम्यान मात्र ते गप्प राहिले. आजही पुतळ्याचे काम अपूर्ण आहे, तरीही त्यांनी भूमिका घेतलेली नाही. हेच त्यांचे दुहेरी राजकारण दाखवते.”
“पत्रकबाजी नव्हे – ठोस कामगिरी दाखवा”
काळभोर यांनी शेवटी आवाहन केले की —
“शहराच्या खऱ्या समस्यांवर उपाय सुचवण्याऐवजी फक्त पत्रकबाजी आणि दिखाऊ राजकारण सुरू आहे. नागरिकांना दिशाभूल न करता विकासासाठी ठोस पावले उचलावीत.”