पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे कर्मचारी प्रकाश गुरधाळकर यांच्यामुळे वाचले या जखमी घुबडाचे प्राण
उत्तम कुटे
पिंपरीःझाडाच्या खोबणीत आढळणारे घुबड दिवसा बाहेर पडत नाही.मात्र,त्याच्या एका पिल्लाने ही चूक केली.मग,ती त्याच्या जीवावरच बेतली होती. पण, थोडक्यात निभावले. कावळ्यांसह इतर पक्षांनी त्याला घेरून त्याच्यावर चोचीने हल्ला केला होता.त्यात ते जखमी झाले.परंतू,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या एआरटी सेंटरमधील कर्मचारी प्रकाश गुरधाळकर यांच्यामुळे त्याचे प्राण वाचले.त्यांनी याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि आपला आवाज चे संपादक उत्तम कुटे यांना सांगताच त्यांनी फोनाफोनी केल्याने वनविभागाने नेमलेली बावधन येथील रेस्क्यू फाऊंडेशन धावून आले. ते जखमी घुबडाच्या पिल्लाला घेऊन गेले.ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या अधिवासात म्हणजे वनात (झाडावर) सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घुबडाविषयी अनेक अंधश्रद्धा असल्याने ते अडचणीत सापडले,तरी त्याच्या मदतीसाठी कोणी सहसा लवकर जात नाही. त्याचे तोंड पाहिले,तर अपशकून होतो,असा मोठा गैरसमज व अंधश्रद्धा असल्याचे या घुबडाच्या सुटकेसाठी मदत झालेले प्राणीमित्र राजेश कांबळे यांनी आपला आवाज ला सांगितले.हा गैरसमज व अंधश्रद्धा असूनही दुपारी जेव्हा खिडकीच्या बाहेर हे घुब़डाचे जखमी पिल्लू दिसले,तेव्हा गुरधाळकर लगेच मदतीसाठी धावले.हे पिल्लू दिवसा बाहेर पडल्याने कावळ्यांच्या कचाट्यात सापडून जखमी झाले होते.त्यामुळे त्याला भरारी घेता येत नव्हती. गुरधाळकर यांनी त्याला एका बॉक्समध्ये सुरक्षित ठेवले. याबाबत त्यांनी फोनवरून कुटे यांना कळवले.प्राणीमित्र कांबळे यांच्या कानावर ही बाब टाकताच त्यांनी रेस्क्यू फाउंडेशन या संकटात सापडलेल्या पक्षी,प्राण्यांची सुटका करणाऱ्या टीमला गाडीसह बोलावले.तोपर्यंत या जखमी पिल्लावर गुरधाळकर लक्ष ठेवून होते.त्यांनी सुखरुपपणे हे पिल्लू या टीमच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.अशुभ मानले जात असले,तरी जखमी झालेल्या या घुबड़ाच्या पिल्लाला वाचविण्यात हातभार लागल्याबद्दल त्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली.

