एनसीआरबी च्या २०२३ च्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
उत्तम कुटे
पिंपरीः देशातील गु्न्हेगारीविषयक राष्ट्रीय गु्न्हे नोंद विभागाचा (एनसीआरबी)अहवाल नुकताच आला.त्यानुसार देशात महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर वन,तर राज्यात पुणे त्यात अग्रस्थानी आहे.सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवणारे राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे.त्याशिवाय रेल्वेतील चोऱ्या आणि आत्महत्या व आत्महत्येस प्रवृत्त करण्यातही महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असून पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी चिंतेची बाब आहे..राज्यातील गुन्ह्यांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
एनसीआरबी’च्या गु्न्हे अहवालानुसार देशात २०२३ मध्ये देशात चार हजार लाचखोरीचे गुन्हे नोंद झाले असून त्यातील तब्बल ७६३ गुन्ह्यांसह महाराष्ट्र एक नंबरवर आहे.राजस्थान आणि कर्नाटक दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि सायबर गुन्हे चिंतेचा विषय आहे. २०२३ मध्ये देशातील एक लाख ७१ हजार आत्महत्यांपैकी १०७८६ आत्महत्या या शेतकऱ्यांच्या असून महाराष्ट्रातील सर्वाधिक ३८.५ टक्के त्या आहेत. नापिकी,कर्जबाजारीपणा आणि ठोस सरकारी धोरणांचा अभाव ही परिस्थिती बदलत नसल्याने शेतकरी जीवन संपवत असल्याचे दिसून येते. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुद्धा चिंताजनक आहेत.या वर्षभरात १३ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून वाढती स्पर्धा,समाजमाध्यमांचा अतिवापर,पालकांचा दबाव,अपयशातून येणारे वैफल्य ही त्यामागील कारणे दिसून आली आहेत.
२०२३ मध्ये देशात एकूण ६२ लाख ४१ हजार ९ गुन्हे नोंद झाले असून २०२२ पेक्षा ते ७.२% ने जास्त आहेत.महिलांविरुद्ध ४.४८ लाख गुन्हे त्यात आहेत.बलात्कारात राजस्थान (५,०७८ प्रकरणे),तर खूनात उत्तर प्रदेश (३,२०६) एक नंबरवर आहे. सायबर गुन्हे ३१ टक्याने वाढून हा आकडा ८६,४२० वर गेला आहे.मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण १ लाख बाल लोकसंख्येमागे ३९.९ नोंदले असून ते आदल्या वर्षापेक्षा नऊ टक्याने वाढले आहेत.त्यात मध्यप्रदेश देशात अव्वल स्थानी आहे.महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र,पश्चिम बंगाल, राजस्थान आघाडीवर असून बलात्काराचे २९,६७० गुन्हे नोंदवले गेले आहेत.
देशातील सर्वाधिक मोठे व सर्वात जास्त लोकसंख्या असलेले उत्तरप्रदेश (यूपी) राज्य हे गुन्हेगारीत सुद्धा (गुन्हेगारी दर तथा प्रमाण) एक नंबरवर आहे.गुन्हे नोंद होण्यात यूपी (७ ,९३,०२०)नंतर महाराष्ट्र असून वर्षभरात तेथे पाच लाख ९६ हजार गुन्हे दाखल झाले. देशात मेघालय या राज्यात सर्वात कमी गुन्हेगारी आहे.महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांचे प्रमाण ४७० असून ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा (४४८)जास्त आहे.राज्याची राजधानी मुंबई फसवणुकीच्या गुन्ह्यांत देशाची राजधानी झाली असून पहिल्या क्रमांकावर आहे.

