शिरूर येथील आधुनिक लहूजी सेनेच्या कार्यक्रमात मातंग समाजाच्या अनेकांचा प्रवेश : सत्ता समीकरणे बदलणार

  आधुनिक लहूजी सेनेचा चौथा वर्धापन दिन व त्या निमित्त शिरूर तालुक्यासह शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील अनेक मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी, या संघटनेत प्रवेश केल्याने प्रस्थापित संघटनांच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कारण यात केवळ नवीन लोकांनीच प्रवेश केलेला नाही, तर अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी या संघटनेत प्रवेश केल्याने सर्वांनाच आछ्यर्याचा धक्का बसलेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अगदी गोपनीय पद्धतीने या पदाधिकाऱ्यांनी या संघटनेत प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. 
 खरे तर मातंग समाजाची एक प्रबळ असणारी संघटना म्हणजे लहूजी शक्ती सेना. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे पुणेस्थित असलेले विष्णुभाऊ कसबे आहेत. त्यांनी ही संघटना वाढवत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेची पाळेमुळे रोवली. तत्कालीन उस्मानाबाद म्हणजेच सध्याचे धाराशिव म्हणून नाव असलेल्या जिल्ह्यात लहूजी शक्ती सेना वाढविण्याचे काम तेथील स्थानिक असलेले दिवंगत सोमनाथ कांबळे यांनी केले. मात्र कोरोना काळाच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या पछ्यात त्यांचे नाव अमर रहावे यासाठी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी, सोमनाथ कांबळे यांच्या पत्नी नगीनाताई यांना नवीन संघटना स्थापन करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे नगीना ताईंनी आधुनिक लहूजी सेना नावाची संघटना सुरू केली. चार वर्षांत त्यांनी इतर संघटनांना तोंड देत अनेक ठिकाणी आपली पाळेमुळे रोवली. आणि आधी संबंध असलेल्या मात्र त्यात नाराज असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या संघटनेत खेचून घेण्यात यश मिळविले. हे सर्व सुरु असताना पुणे जिल्ह्यात लहूजी शक्ती सेना फुटेल अशी सुतराम शक्यता नसतानाही, अगदी दिग्गज असणारे पदाधिकाऱ्यांनी लहूजी शक्ती सेनेला राम राम करत, नवीन म्हणजेच आधुनिक लहूजी सेनेत प्रवेश केल्याने, प्रस्थापितांनीही आपण कुठे चुकलोत ? याचे सिंहावलोकन करण्याची वेळ यामुळे आलेली दिसतेय. 


  पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात, शनिवार दि. २७/०९/२०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात, शिरूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शेजारील जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या संघटनेत प्रवेश केल्याने, आत्ता येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हे प्रवेश नवीन संघटनेने करवून घेतल्याने, यामुळे येथील सत्ता समीकरणे बदलणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 
   आधुनिक लहूजी सेना या संघटनेत शिरूरच्या कार्यक्रमात प्रवेश करवून आणण्यात, शिरूर शहरातील लहूजी शक्ती सेनेचे माजी शहरप्रमुख सोनू काळोखे हे महत्वाचे असल्याचे समजते. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, काही दिवसांपासून आमच्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी माझ्यासह इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता अनेक कार्यक्रम घेतले, त्यात आम्हा सर्वांना डावलण्यात आले, आमचा अपमान व मानहानी होईल अशी कुठलीच साधी त्यांनी सोडली नाही. तसेच तालुक्यात व शहरात नव्याने ज्या निवडी केल्या गेल्या त्या मनमानी पद्धतीने व कुणालाही विचारात न घेता केल्या गेल्या. या निवडी करत असताना यात कुठलेच निकष लावल्याचे दिसले नाही. या पदांसाठी पात्र नसणाऱ्या कार्यकर्त्यांना खैरात वाटल्या सारखी पदे वाटली. त्यामुळे संघटनेची प्रतिमा मलिन झाल्याने, आम्ही सर्व नाराज कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिवंगत व लढवय्ये असणारे आमच्या समाजाचे नेते सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या स्मृतीसाठी त्यांच्या पत्नी नगीनाताई कांबळे यांनी बांधलेल्या संघटनेत प्रवेश केलाय. 
  या संघटनेत प्रवेश करणाऱ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, लहूजी शक्ती सेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी असल्याने, शिरूर शहर, तालुक्यासह परिसरातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यात लहूजी शक्ती सेनेला खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे.
  नव्या संघटनेत पद मिळालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे :-

विजय मोहिते – पुणे जिल्हाध्यक्ष, संजय फाजगे – पुणे जिल्हा युवकाध्यक्ष, रोहिणी शेंडगे – पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष, सचिन काळोखे – जिल्हाध्यक्ष पुणे कोअर कमिटी, संदीप अवचिते – अहिल्यानगर लोकसभा उपाध्यक्ष, अर्चना शेंडगे – पुणे जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष, संतोष जाधव – पुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाऊसाहेब साठे – शिरूर विधानसभाध्यक्ष, नागेश साळवे – शिरूर तालुकाध्यक्ष, अक्षय शेलार – शिरूर तालुका युवकाध्यक्ष, रेशमा जाधव – दौंड तालुका महिला आघाडी अध्यक्ष, – आकाश पंचरास आंबेगाव तालुकाध्यक्ष, राज बनसोडे – हवेली तालुका युवक कार्याध्यक्ष, राहुल जाधव – शिरूर तालुका कार्याध्यक्ष, राहुल सकट – शिरूर तालुका सचिव, सारिका जाधव – दौंड तालुका महिला उपाध्यक्षा, दया मुंडे – महासचिव शिरूर महिला आघाडी, सोमनाथ साबळे – शिरूर शहराध्यक्ष, सोनु काळोखे – शिरूर शहराध्यक्ष, ओंमकार आडागळे – युवक शहराध्यक्ष, बाळासाहेब शेंडगे – शहर युवक कार्याध्यक्ष, सुनील बागवे – शहर युवक उपाध्यक्ष, रुपाली सकट – शिरूर शहर उपाध्यक्ष, प्रताप शेंडगे – शिरूर शहर युवक कार्याध्यक्ष.


शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना नगीनाताई कांबळे म्हणाल्या की, “मातंग समाजाच्या परिवर्तनाची चळवळ नेहमी गतिमान करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेची ताकद आणखीन वाढलेली आहे. आपली संघटना ही समाजाच्या प्रमाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर सक्षमपणे कार्यरत असून, आधुनिक फकिरा म्हणून समजल्या जाणाऱ्या दिवंगत सोमनाथभाऊ कांबळे यांच्यासोबत सहकारी म्हणून काम केलेल्या अनुभवी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या येण्यामुळे, संघटनेची ताकद आणखीन वाढून समाजाचे काम करण्याची गती वाढणार आहे.”
यावेळी नगीना कांबळे यांच्यासह संघटनेचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, राज्य सचिव राहुल आरडे, मृणाल कांबळे, पश्चिम महाराष्ट्र म.आ. अध्यक्ष स्वाती आरडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी साठे, नगर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, नगर जिल्हा मीडिया अध्यक्ष अजय शिंदे, धाराशिव मीडिया जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
मातंग समाजाच्या या नवीन संघटनेत लहूजी शक्ती सेनेच्या नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने, लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, तसेच संघटनेचे राज्य सह सचिव तसेच शिरूर नगर परिषदेच्या नगरसेविका रेश्मा लोखंडे यांचे पती दादाभाऊ लोखंडे यांना तर डोकेदुखी वाढलेली आहेच. परंतु शिरूर नगर परिषदेत नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या तयारीत असलेल्या बंटी जोगदंड यांचे भवितव्य अंधारात असल्याचे चित्र निर्माण करण्यात, लहूजी शक्ती सेनेचे माजी शहराध्यक्ष सोनू काळोखे हे प्रमुख ठरल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण युवक जिल्हाध्यक्ष बंटी जोगदंड व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्यामुळेच आम्ही लहूजी शक्ती सेना सोडली असून, लहूजी शक्ती सेनेच्या पडझडीला हे दोघे जबाबदार असल्याचे, नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. तर या सर्व आरोपांचे खंडन बंटी जोगदंड यांनी प्रतिक्रिया देताना केलेय.