पिं.चि.मनपा कर्मचारी,अधिकाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी,६५कोटींचा बोनस जाहीर

किमान ४० हजार ते कमाल दोन लाखाचा बोनस मिळण्यास दोन दिवसात सुरुवात होणार

उत्तम कुटे
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी,अधिकाऱ्यांची दिवाळी यावर्षीही गोड होणार आहे.कारण त्यांना गेल्यावर्षाएवढाच म्हणजे ८.३३ टक्के (एक पगार) बोनस अधिक वीस हजार रुपयेही मिळणार आहे.कर्मचाऱ्याला किमान चाळीस हजार,तर आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्याला दोन लाख रुपये बोनस मिळणार आहे.कायद्याने सरसकट बोनस देता येत नसल्याने मनपा प्रशासनाने त्याला सानुग्रह अनुदान असे नाव देऊन पळवाट काढली आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज तो जाहीर करीत त्वरेने देण्याचा आदेश काढला.

मनपा च्या आस्थापनेवरील घंटागाडी कर्मचाऱ्यांपासून ते आयुक्तांपर्यंत अंदाजे आठ हजार कर्मचार्‍यांना ६५ कोटी रुपयांच्या बोनस वाटपास येत्या दोन दिवसांत सुरवात होणार आहे.त्यात बाराशे प्राथमिक,तर साडेतीनशे माध्यमिक शिक्षक आहेत.२०२४-२५ या आर्थिक वर्षात निलंबित व सेवानिवृत्त झालेले तसेच राजीनामा दिलेले मनपा कर्मचारी,अधिकारी यांनाही तो मिळणार आहे.दिवाळी पूर्वी बोनस मिळेल,य़ाची दक्षता घेण्यास आयुक्तांनी सबंधितांना बजावले आहे.बोनस कराराचे हे शेवटचे वर्ष असून त्यासाठी पुन्हा तो केला जाणार असल्याचे पि.चि.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजूर्डे यांनी आज आपला आवाज ला सांगितले.

माजी मनपा आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी,मनपा चे माजी मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी कायद्यात बसत नसल्याने यापूर्वी बोनस घेतलेला नव्हता. कायद्यानुसार २१ हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना बोनस दिला जात नाही.त्यामुळे पिं.चि.आणि पुणे मनपा वगळता राज्यात इतर कुठलीच महापालिका बोनस देत नाही.त्या काहू हजारांचे सानुग्रह अनुदान देतात.ते सुद्धा पि.चि. मनपा सारखे घसघशीत नसते.पिं.चि. मनपा बोनस हा सानुग्रह अनुदान म्हणून देते.तर,सानुग्रह अनुदानाची रक्कम ही जादा (बक्षीस) म्हणून देते. ती सुद्धा इतर मनपा सारखी काही हजार नाही, तर वीस हजार रुपये आहे.बेकायदेशीर बोनस हा जनतेच्या कररुपी पैशाची उधळपट्टी असल्याने घेण्यासच नाही,तर देण्यासही लांडे यांनी विरोध केला होता. त्याविरोधात राज्य सरकारला पत्रही लिहिले होते.पण,त्याची दखलच घेतली गेली नाही.परिणामी बोनस वाटप सुरुच आहे.बोनसचा पैसा पाय़ाभूत सुविधांवर खर्च होणे अपेक्षित असल्याचे लांडे यांचे त्यावेळी म्हणणे होते व आजही आहे.