जालना येथील दीपक बोऱ्हाडेंनी १६ व्या दिवशी उपोषण सोडले
पिंपरी, (प्रतिनिधी) दि.03 : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मागील सोळा दिवसांपासून जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सुरू होते. त्यांची तब्येत खालावली असून, विजयादशमीच्या दिवशी अखेर हे उपोषण सुटले आहे. त्यांची मुलगी अहिल्या हिच्या हस्ते ज्यूस पिऊन दीपक बोहाडे यांनी उपोषण सोडले. शासनाने वेळ मागितला आहे. त्यांना वेळ देऊ, आणखी महिनाभर वाट पाहू. निवडणुकीपूर्वीच शासनाने तोडगा काढावा. शारीरिक कमजोरी भरून काढून पुन्हा लढाईला भक्कम करू, लढा आणि सरकार सोबत चर्चाही सुरू राहील, असे आंदोलनकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले.
आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याबाबत उपोषणस्थळी राज्यभरातील अभ्यासक, उपोषणकर्ते, निवडक समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. भावनिक होत अश्रू अनावर झालेल्या दीपक बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना उपोषणातून मोठा संघर्ष उभा राहिला. आपण सर्व ताकद, प्राणपणाने आणि प्रामाणिकपणे लढलो. समाज एकजूट झाला मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी ताकद दाखवून शासनावर दबाव न आणल्याने कमी पडलो. परिणामी लढाई जिंकता आली नाही. आरक्षण अंमलबजावणीचा विजयोत्सव साजरा न करता आल्याबद्दल बो-हाडे यांनी खंत व्यक्त केली.
मुलगी अहिल्या हिच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडताना दीपक बोऱ्हाडे यांनी काही नेत्यांनी आरक्षणाच्या नावावर स्वतःचे गल्ले भरले असल्याचही सांगितले.राजकीय, अराजकीय पदे मिळवली. समाजाला अराजकीय, प्रामाणिक, लढवय्ये नेतृत्व मिळाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच सरकारचे प्रतिनिधी येऊन भेटले आहेत. जिल्हाभरात रास्ता रोको, ढोल बजाओ आंदोलनेही झाली आहेत. आता सरकारला महिनाभर वेळ देऊन निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.

