कुख्यात फरार गुंड निलेश घायवळ चा आणखी एक कारनामा उघड

कोथरुड व कर्जत-जामखेड मतदारसंघात पत्नीसह मतदारयादीत नाव

उत्तम कुटे
पिंपरीः मतदारयादीत घोटाळा करीत बोगस मतदारांच्या मदतीने भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकल्याचा दावा यापूर्वीच कॉंग्रेसचे राहूल गांधी यांनी केला असून त्यावरून उफाळलेला वाद अद्याप शमलेला नाही.त्यानंतर शिरुर विधानसभा मतदारसंघातही असे अनेक बनावट मतदार आढळल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने दिली.या पार्श्वभूमीवर बनावट तथा दुबार मतदार नोंदणीचे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.पुण्यातील कुख्यात फऱार गुंड निलेश घायवळ (गायवळ?)याचे तो राहत असलेल्या कोथरुड सह अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही मतदारयादीत पत्नी स्वातीसह नाव आढळले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माहिती अधिकारात हा प्रकार समोर आणला.त्यामुळे बनावट नाव नोंदणी तथा बोगस मतदार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून तो आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कळीचा बनणार आहे.

राज्याचे उच्च,तंत्र शिक्षण मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील हे कोथरुडमधून,तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे रोहित पवार हे जामखेडमधून निवडून आलेले आहेत.
पुणे पोलिसांनी मोक्का सह मालमत्ता जप्तीचे हत्यार उपसल्याने घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पळून गेला आहे.त्यासाठी त्याने अहिल्यानगर येथे राहत असल्याचा बनाव करीत तशी कागदपत्रे बनवली होती.लंडन की स्वित्झर्लंड कुठल्या देशात त्याने पलायन केले आहे,हे पुणे पोलिसांनाही खात्रीशीरपणे सांगता आलेले नाही.दुसरीकडे त्याच्या शोधासाठी त्यांनी लुकआऊट नोटीस,मात्र काढली आहे.त्यानंतर आता नावात व वयात किंचीत बदल करीत त्याच्या बनावटगिरीची दुसरा कारनामा समोर आला आहे.कोथरुडमध्ये त्याने निलेशकुमार हे नाव धारण करीत आपले वय ४८,तर तेच जामखेड मध्ये त्याने निलेश आणि वय ४७ असे मतदारयादीत नमूद केले आहे.म्हणजे या घायवळ की गायवळ दांपत्याकडे दोन नाही,तर चक्क चार मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळली आहेत.निलेशने पत्नीचे आडनाव एका ठिकाणी गइवाल,तर स्वताचे गायवळ असे लावले आहे.

ही डुप्लिकेट मतदार नोंद म्हणजे शुद्ध मतदान बनवेगिरी असल्याचा हल्लाबोल कुंभार यांनी या बोगस मतदार नोंदणी व बनावट मतदार यादीवर केला.एक जोडपे असे करू शकते,तर अजून किती “दुबार मतदार” या याद्यांमध्ये असतील याची कल्पना करा!असे म्हणत त्यांनी मतदार यादीवर शंका उपस्थित केली.अशी हजारो बोगस नावे या यादीत असल्याचा दावा त्यांनी केला.नावात किंचीत बदल करून मतदार यादीत दुबार नोंद करणे ही चिंतेची बाब असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.