विद्यार्थ्यांनी बनवल्या ४ हजार पणत्या
नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
दिपावली हा दिव्यांचा उत्सव ! या निमित्ताने घरोघरी पणती लावली जाते. नारायणगाव येथील अनंतराव इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शाळेतल्या इ. १ली ते १० वीच्या २ हजार विद्यार्थ्यांनी पणत्या रंगवून आणि सजवून दिपावलीचा जागर केला. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन याप्रमाणे चार हजार पणत्या शाळेने सर्व विद्यार्थ्यांसाठी दिल्या, आणि एक अनोखा उपक्रम करण्याचे आवाहन केले. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. आर्किटेक्ट सचिन घोडेकर व प्रिया घोडेकर यांना दोन दिवस आधी सर्व विद्यार्थ्यांना पणत्या कशा सजवू शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेसही उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. इ. १ ली ते १० वी चे सर्व विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडांगणावर आपल्या सजावट साहित्यासह एकत्र आले. अर्धवर्तुळ, वर्तुळ, त्रिकोण अशा विविध आकारात बसून विद्यार्थ्यांनी विविध रंगात व विविध प्रकारच्या साहित्याने पणत्यांची सजावट केली. शाळेच्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण शाळा आकाशकंदील लावून व या पणत्यांची ज्योत पेटवून दिवाळी साजरी करण्याचा मानस ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रिया कामत, स्मिता मंडलिक, संतोष खुडे यांनी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी, वैशाली पुंडे, रंजना पिल्ले यांच्या सहाय्याने केले. अत्यंत सुंदर व विविध पद्धतीनी सजविलेल्या पणत्यांचे परीक्षण कावेरी निंबारकर, आरती गायकवाड, माधवी चिलप, उल्का गोंधळी, अश्विनी नवले, वृषाली बोऱ्हाडे, संतोष खुडे व अरविंद घोलप यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळाचे उपकार्याध्यक्ष व स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ. आनंद कुलकर्णी यांनी या उपक्रमाप्रसंगी उपस्थित राहून सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. अशी माहिती अनघा जोशी यांनी दिली.

