प्रारूप प्रभाग रचनेवर मतदार उदासीन

१३ दिवसांत घेतल्या फक्त १७ हरकती

उत्तम कुटे
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात २२ तारखेला प्रशासनाने प्रारुप आराखडा जाहीर केला.त्याच दिवसापासून त्यावर हरकती,सुचना आणि आक्षेप नोंदविण्यास त्यांनी सुरवात केली.मात्र,गेल्या १३ दिवसांत त्या फक्त १७ च आल्या आहेत,अशी माहिती मनपा च्या निवडणूक विभागाचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी आज आपला आवाज ला आज दिली.त्यातून पिंपरी-चिंचवडकरच नाही,तर राजकीय पक्ष,त्यांचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्तेही मोठे उदासीन असल्याने दिसून आले आहे.दरम्यान,गणेशोत्सव काळात या हरकती घेण्यात आल्याने त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर तिला पुण्यात जसा मोठा विरोध झाला,तसा उद्योगनगरीत पहावयास मिळाला नाही.ना सत्ताधारी राजकीय पक्ष,नेत्यांनी त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केलं ना,विरोधकांनी त्यावर सडकून टीका केली.पुण्यासारखी नवीन गावे पिं.चि.मनपा त न आल्याने त्यातून प्रभागांची मोडतोड झाली नाही.परिणामी तो सुरक्षित शोधण्याची पाळी माजी नगरसेवकांसह इच्छूकांवर पिंपरी-चिंचवडमध्ये आली नाही.२०१७ एवढेच प्रभाग (३२)आणि नगरसेवकांची संख्या (१२८) राहिल्याने प्रभाग रचनाही तशीच काहीशी राहिली.ती सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोईने बनवली,असा आरोपही विरोधकांनी केला नाही.यामुळेही या रचनेवर मोठ्या संख्येने आक्षेप घेण्यात आले नाहीत. त्यातून ती व्यवस्थित झाल्याची पावतीच जणू काही मिळाल्याने प्रशासन,मात्र सुखावले गेले.

उद्या (ता.४) हरकती घेण्यााची मुदत संपणार आहे.परंतू,आतापर्यंतचा निरुत्साह पाहता त्या पन्नासचा आकडा,तरी पार करतील का नाही,याविषयी शंकाच आहे.हा वेग असाच राहिला,तर त्यावरील सुनावणी झटपट होणार आहे. परिणामी प्रभाग रचना अंतिम होण्यास फारसे प्रयास पडणार नाही.तसेच ती कायम होताना त्यात फारसा बदलही होणार नाही.दरम्यान,नोंदविलेल्या हरकती सुद्धा तेवढ्या गंभीर नसल्याचे समजते.प्रभागाचे नाव बदलावे वा तो राखीव करावा अशा प्रकारच्या सुचना त्यात करण्यात आल्या आहेत.