मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य आजही प्रेरणादायी – सुजित खैरे

नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
मेजर ध्यानचंद यांचे खेळातील कार्य युवकांनी आजही समोर ठेवून क्रीडा क्षेत्रामध्ये योग्य नावलौकिक मिळवावा. तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांचा आपल्या आवडीनुसार अंगीकार करून आपले ध्येय आणि जिद्द या बळावर खेळातील उच्चस्थान मिळवावे असे आव्हान करतानाच मेजर ध्यानचंद यांचं क्रीडा क्षेत्रातील कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असेच आहे असे प्रतिपादन ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे यांनी केले.


राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खैरे बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे व क्रीडा समितीचे प्रमुख आणि ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डॉ. संदीप डोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मेजर ध्यानचंद यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात हॉकी या क्रीडा क्षेत्रामध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवून दिली . सैन्य दलातील सेवेबरोबरच खेळ विश्वात हॉकी या खेळाचे महत्व त्यांनी युवकांना पटवून दिले. त्यांच्या चेंडूवरच्या नियंत्रणामुळे त्यांना हॉकीचा जादूगार असे संबोधले गेले. असेही मनोगत सुजित खैरे यांनी यावेळी केले. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाने उत्तर पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये युवकांच्या क्रीडावृत्तीला चालना मिळावी यासाठी विविध प्रकारच्या सुविधा शाळा आणि महाविद्यालय पातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्रीडाशिक्षक देखील त्यांचे कौशल्य विद्यार्थ्यांसाठी देत असतात. खेळातील नवोपक्रम आणि आधुनिकता या दृष्टीने युवकांनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी कोणत्याही खेळाकडे खिलाडू वृत्तीने पाहावे, त्यासाठी ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव हे युवकांना प्रोत्साहन देईल असे मत क्रीडा समितीचे प्रमुख व ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डॉ. संदीप डोळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी हे होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने नारायणगाव महाविद्यालयातील विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी विविध क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवले अशा निवडक विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. या यामध्ये मलिक अब्दुल रहमान (कबड्डी), साक्षी गायकवाड (हातोडा फेक), अभिषेक रसाळ (लांबउडी) तेजस मधे (हॉकी) प्रथमेश भागवत (हॉलीबॉल) या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव यामधील विद्यार्थ्यांचा व्हॉलीबॉल व बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जे. पी .भोसले, डॉ. दिलीप शिवणे डॉ. लहू गायकवाड, डॉ.उत्तम पठारे, डॉ. अनिल काळे तसेच महाविद्यालयातील खेळाडू व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन क्रीडा शिक्षक प्रा.ओंकार मेहेर व प्रा.सचिन काशीद यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले तर आभार डॉ. शरद काफले यांनी मानले.