वरिष्ठ उपाध्यक्ष तुषार हिंगेंनी २४ तासात केला पदाला रामराम
उत्तम कुटे
पिंपरीःभाजपची पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी (१२६ जणांची) काल (ता.२७)जाहीर झाली.त्यात वरिष्ठ शहर उपाध्यक्ष म्हणून तुषार हिंगे यांची नियुक्ती झाली होती.परंतू,त्याला २४ तास व्हायच्या आत त्यांनी आपल्या पदाचा अचानक तडकाफडकी राजीनामा आज (ता.२८)दिला.त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली.आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत हिंगेसह आठ वरिष्ठ उपाध्यक्ष व तेवढेच सचिव होते.मात्र,हिंगेंच्या राजीनाम्यामुळे वरिष्ठ उपाध्यक्षांची संख्या सातवर येणार आहे.
वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे हिंगे यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.मात्र,त्याचवेळी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढीसाठी त्याच जोमाने काम करत राहणार असल्याचेही त्यांनी त्यात स्पष्ट केले आहे.त्यांचा हा तीन ओळींचा राजीनामा शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे स्वीकारतात,य़ाकडे शहर भाजपच नाही,तर राजकीय क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.माझ्या प्रभागात चांगले काम करता यावे यासाठी हा राजीनामा दिल्याचे हिंगे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज ला सांगितले.तसेच दिलेले पद हे खूप मोठे होते,आहे असे ते उपरोधिकपणे म्हणाले.त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे.तसेच ते गत टर्मला उपमहापौरही होते.त्यानंतर त्यांचे प्रमोशन होऊन ते भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष पदी गेले होते.त्या पदावरून पुन्हा त्यांना वरचे पद मिळणे अपेक्षित होते.परंतू,पुन्हा खालचे ते दिले गेल्याने नाराज होऊन त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचे समजते.
दरम्यान,नव्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने यापूर्वी चिटणीस पदावर काम केलेले सचिन काळभोर हे ही नाराज झाले आहेत.चिंचवडचे पक्षाचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि नंतर त्यांच्या पत्नी आ.अश्विनी यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. नागरी प्रश्नांविषयी ते जागरूक असून त्यावर त्यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत.आमदार महेश लांडगेंच्या उमेदवारीला विरोध केला म्हणून की नागरी समस्या मांडल्या म्हणून आपल्याला स्थान देण्यात आले नाही,अशी विचारणा त्यांनी केली.तरीही पक्षाचे काम निष्ठेने व प्रमाणिपणाने करणार असल्याचे काळभोर यांनी स्पष्ट केलं.

