उन्नती फाऊंडेशन देतंय इको फ्रेंडली गणेशोत्सवाला चालना, करतंय शाडूच्या मुर्त्यांचे वाटप

उद्योगनगरीतील संजय भिसे,डॉ.कुंदा भिसे दांपत्य पर्यावरण रक्षणात उचलतंय खारीचा वाटा

उत्तम कुटे
पिंपरीःस्वस्त असल्याने गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस च्या (पीओपी) मुर्त्यांना मोठी मागणी असते. पण,विसर्जनानंतर त्या पाण्यात लगेचच विरघळत नाहीत.तसेच त्यातील रसायनांमुळे जलप्रदूषणही होते.परिणामी पर्यावरणाची हानी होते. ते होऊ नये म्हणून उद्योगनगरीतील डॉ कुंदा भिसे आणि उद्योजक संजय भिसे हे दांपत्य गेल्या सात वर्षापासून पाण्यात सहज आणि लगेचच विरघळणाऱ्या व कुठलेही रसायन नसलेल्या शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मुर्त्या्ंचे वाटप करीत इको फ्रेंडली गणेशोत्सवाला चालना देत आहेत.तो पर्यावरणपूरक होण्यासाठी आपल्या उन्नती सोशल फाऊंड़ेशनमार्फत खारीचा वाटा उचलीत आहेत.त्यांच्या या उपक्रमाबाबत गणेशभक्तांत कौतुकाची भावना आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीपासूनही बनविलेल्या मुर्त्यांचे वाटप भिसे दांपत्य करीत आहेत,हे विशेष.शिवाय त्या देताना मुर्ती आमची,इच्छा तुमची ही संकल्पना त्यांनी राबविलेली आहे.म्हणजे भक्तांना परवडेल ती मुर्तीची किंमत म्हणून ते तेथे ठेवलेल्या दानपेटीत टाकायची असते.त्यांच्या मुर्त्यांना विशिष्ट अशी किंमत ठेवलेली नाही.काही गरीब भक्त,तर ती विना पैसेही घेऊन जातात.दानपेटीत जमा होणारे पैसे ते रंजल्यागांजल्यासाठी देतात.दिव्यांगाची लग्ने,गरीब शेतकऱ्यांना मदत अशा सामाजिक कामासाठी हा निधी वापरला जातो.आणखी एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येक गणेशमूर्तीबरोबर तुळशीचे वा फुलांचं रोपटं देखील ते देतात. त्यातून गणेशोत्सवाबरोबर पर्यावरण रक्षणाचा हरित संदेशही समाजात दिला जातो. पीओपी च्या मूर्त्यांमुळे होणारं प्रदूषण टाळून, शाडू मातीच्या मूर्त्यांतून स्वच्छ व सुरक्षित गणेशोत्सवाचा संदेश भिसे दांपत्य देत आहे.

आपल्या या इको फ्रेंडली उपक्रमाविषयी भिसे दांपत्याने आपला आवाज ला माहिती दिली.गणेशभक्तांचा कल हळूहळू शाडूच्या पर्यावरणपूरक मुर्त्यांकडे वाढू लागल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या वर्षी त्यांनी अशा दोनशे मुर्त्यांचे वाटप केले.हा आकडा यावर्षी एक हजारावर गेला,असे ते म्हणाले.पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे या आणि शाडूचा गणपती म्हणजे मुर्ती बसवा,असे आवाहन त्यांनी केले आहे.काऱण विसर्जनानंतर पीओपी च्या मुर्त्यांचे विघटन लवकर होत नाही,त्यातून त्यांची विटंबना होते,याकडे भिसे दांपत्याने लक्ष वेधले.