पाच दिवसांत आल्या फक्त दोन हरकती,राहिलेल्या नऊ दिवसांत काय होणार?
उत्तम कुटे
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २२ तारखेला प्रशासनाने प्रारुप आराखडा जाहीर करीत या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.मात्र,त्यावर गेल्या पाच दिवसांत फक्त दोनच हरकती आल्याने पिंपरी-चिंचवडकरच नाही,तर राजकीय पक्ष,त्यांचे पदाधिकारी, नेते,कार्यकर्तेही उदासीन असल्याने दिसून आले आहे.उद्या गणरायाचे आगमन होत असल्याने त्याच्या तयारीत व्यस्त असल्याने हे घडले असण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही उदासिनता हरकती,आक्षेप नोंदवायच्या व सुचना करायच्या राहिलेल्या नऊ दिवसांत चार सप्टेंबरपर्यंत भरून निघेल,अशी आशा करायला हरकत नाही.
दरम्यान,शहरवासियांनी तूर्तास दाखविलेल्या या उदासीनतेमुळे प्रशासन,मात्र सुखावले आहे.ही प्रभाग रचना व्यवस्थित झाल्याची पावतीच जणू काही आपल्याला मिळाली,अशा आविर्भावात ते सध्या आहेत.जसा शेजारच्या पुणे मनपा च्या या प्रारुप प्रभाग रचनेवर ती जाहीर होताच लगेचच मोठा विरोध दिसून आला,तसं काही उद्योगनगरीत झालं नाही.ना सत्ताधारी राजकीय पक्ष,नेत्यांनी त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केलं ना,विरोधकांनी त्यावर सडकून टीका केली.पुण्यासारखी नवीन गावे पिं.चि.मनपा त न आल्याने प्रभागांची मोडतोड न झाल्याने त्यातून तो सुरक्षित शोधण्याची पाळी माजी नगरसेवकांसह इच्छूकांवर पिंपरी-चिंचवडमध्ये आली नाही.२०१७ एवढेच प्रभाग (३२)आणि नगरसेवकांची संख्या (१२८) राहिल्याने प्रभाग रचनाही तशीच काहीशी राहिली.परिणामी नव्या वादाला तूर्तास,तरी तोंड फुटलेले नाही.
४ सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत,जर हरकतींचा वेग असाच राहिला आणि त्यातून त्या कमी आल्या,तर त्यावरील सुनावणी झटपट होणार आहे. परिणामी ती अंतिम होण्यास फारसे प्रयास पडणार नाही.तसेच ती कायम होताना त्यात फारसा बदलही होणार नाही.आजपर्यंत (ता.२६) फक्त दोन हरकती प्रारुप प्रभाग रचनेवर आल्याचे पिं.चि. मनपा च्या निवडणूक विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी आपला आवाज ला सांगितले.प्रभाग ८ मधून हरकत नाही,तर सुचना करण्यात आली आहे.या इंद्रायणीनगर प्रभागाला संतनगर नाव देण्याची मागणीवजा सुचना करण्यात आली आहे.तर, प्रभाग २१ मध्येही काहीशी तशीच मागणीवजा सूचना केली गेली आहे.तेथे एससी,एसटी आणि आदीवासी मतदार अधिक असल्याने तो त्यासाठी आरक्षित करण्याची हरकत घेण्यात आली आहे.

