पिं.चि.मधील बालगुन्हेगारी कमी होईना,आता अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोक्यात मारला हातोडा

 

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःमे महिन्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सुरु झालेली खुनाची मालिका अद्याप सुरुच आहे.दुसरीकडे खूनासह खूनाचा प्रयत्न,गंभीर दुखापत अशा गु्ह्यांत बालगुन्हेगारांचा सहभाग वाढला असून ती पोलिसांच्याच नाही,तर समाजाच्या दृष्टीनेही गंभीर बाब बनली आहे.नुकताच पिंपरीतील एसएनबीपी स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावातील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या वर्गातील दुसऱ्या मुलाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला गंभीर केले.त्याला १६ टाके पडले.या घटनेतून बालगुन्हेगारी शहरात थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून आले.तसेच हा प्रश्न किती गंभीर बनला आहे,हे ही कळले.या वाढत्या बालगुन्हेगारीमुळे बालगुन्हेगारांचे वय १८ वरून १६ करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला असून ती काळाजी गरज बनली आहे

दरम्यान,या वाढत्या बालगुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करीत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शहरातील आमदार अमित गोरखे यांनी नुकतीच (ता.४)विधानपरिषदेत केली.या गंभीर,ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधत बाल न्याय कायद्यातील पळवाटा बंद करण्याचा आग्रह धरला होता.त्याच दिवशी उद्योगनगरीत बालगुन्हेगारांनी दोन गंभीर गुन्हे केले.त्यात एकाविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा,तर दुसऱ्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड येथील घटनेत चेष्टामस्करीतून बालगुन्हेगाराने एकावर खूनी हल्ला केला.आपल्या मित्राला चापट्या मारल्याचा जाब विचारणाऱ्या विष्णू विठ्ठल गायकवाड (वय २१,रा.एकता कॉलनी,डांगे चौक,वाकड)याच्यावर त्याने कात्रीने हल्ला केला.ही घटना रात्री घडली.तर,त्याच दिवशी सकाळी एसएनबीपी स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये दुसरी घटना घडली.त्यात बारावीतील अल्पवयीन विद्यार्थ्य़ाने आपल्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात शाळेची घंटा तथा बेल वाजविणारा हातोडा मारला.त्याबाबत गुन्हा दाखल झालेल्या संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरक्ष कुंभार यांनी आपला आवाज ला माहिती दिली हा प्रकार क्षुल्लक कारणातून घडला.त्यात सुशील जलगुडी (वय १९) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला १६ टाके पडले एवढी मोठी जखम त्याला या हातोड्याच्या घावातून झाली.दुसऱ्या मुलाचा बाहेर मार खाल्ला म्हणून सुशीलने या अल्पवयीन विद्यार्थ्याला चिडवले.त्याचा त्याला राग आला.तो पळतच वर्गाबाहेर गेला.त्याने बेलचा हातोडा आणला.तो सुशीलच्या डोक्यात मारला.त्यात तो रक्तबंबाळ झाला.हे पाहून त्या वर्गातच नाही, तर कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली.नंतर या बालगुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पांडे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान,आपल्या संस्थेत घडलेला हा प्रकार दुर्दैवी असल्याची खंत एसएनबीपी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष दशरथ भोसले यांनी व्यक्त केली.ही घटना निंदनीय असल्याचे सांगत तिचा त्यांनी निषेध केला. अशा घटना घडू नयेत म्हणून काळजी घेत असून भविष्यातही ती घेतली जाईल,असा निर्वाळा त्यांनी आपला आवाज शी बोलताना दिला.