वादग्रस्त डीपी बनविणाऱ्यांची झाली बदली,आता डीपी तही बदल होणार?

उत्तम कुटे
पिंपरीःतीस हजारावर हरकती आल्याने मोठा वादग्रस्त ठरलेला उद्योगनगरीचा सर्वंकष विकास आऱाखडा तथा डीपी बनविणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वादग्रस्त नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची काल (ता.७)राज्य सरकारने बदली केली.त्यामुळे या डीपी त बदल होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले.दरम्यान,या डीपीत शहरवासियांवर अन्याय होणार नाही,असे आश्वासन राज्य सरकारने विधानसभेत आज (ता.८)दिल्याने त्यात बदल निश्चीत होणार याला दुजोरा मिळाला.

या डीपी विरोधात जनमत प्रक्षुब्ध असून त्यातूनच त्यात मोशी येथे टाकण्यात आलेले कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली.ही घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरात येऊन करावी लागली.शेक़डो घरे बाधीत होतील आणि बिल्डरांना फायदा होईल,अशी आरक्षणे या डीपी त असल्याने हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित झाला.त्यातून गायकवाड यांची बदली काल नगरविकास विभागाने केल्याचे समजते. मात्र, त्यांना हे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुक्त करण्यात येणार असल्याचे महापालिकेतून आज सांगण्यात आले.त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील वाहतूक व परिवहनच्या नगर रचना विभागाच्या उपसंचालकपदी करण्यात आली आहे.त्यांच्यासह आणखी तीन नगररचना उपसंचालक आणि एक संचालक अशा चौघांची काल बदली केली गेली.गायकवाड यांच्या जागी राज्याच्या नागरी संशोधन घटक विभागाचे संचालक किशोर विष्णू गोखले हे बदलून आले आहेत.

गायकवाड यांची काल बदली झाली अन आज विधानसभेत पिं.चि.च्या डीपी त शहरवासियांवर अन्याय होणार नाही,असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांच्या लक्षवेधीवर दिले.गरिबांची घरे बाधित होणार नाहीत.देवस्थानच्या जमिनींवर पडलेल्या आरक्षणांची तपासणी करुन ती रद्द केली जातील,त्यांनी सांगितले.तत्पूर्वी सभागृहात बोलताना हा डीपी चुकीच्या पद्धतीने तयार केला असून त्यात बांधकाम परवाने घेतलेल्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे,याकडे आ.जगताप यांनी लक्ष वेधले.पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द करून तेथे कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे ते टाकले गेल्याचे त्यांनी सांगितले.तर,देवस्थानांवरील आरक्षणे रद्द करण्याची मागणी करताना भूमिपुत्र भूमिहीन झाला नाही पाहिजे तसेच कोणावरही अन्याय होवू नये,असे आ.लांडगे म्हणाले.घेतलेल्या हरकतींवर निष्पक्ष कार्यवाही करून डीपी अंतिम करावा,अशी मागणी त्यांनी केली.