रवींद्र खुडे विभागीय संपादक
रेडिओ लहरींचा अभ्यास करणारी जागतिक दुर्बीण ही भारतातील महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मौजे खोडद येथे 1980 ते 1990 च्या दशकात, TIFR (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल ॲन्ड रिसर्च) द्वारे, तत्कालीन ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोविंद स्वरूप तसेच शास्त्रज्ञ कपाही व अन्य अभ्यासकांच्या सहाय्याने, GMRT (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) नावाने उभारली गेली. त्यामुळे या निसर्गसंपन्न जुन्नर तालुक्यात कारखानदारीला बॅन आला. त्यामुळे तालुक्यासह खोडदकरांच्या नशिबात केवळ शेती करणे व त्यावरच आपली ऊपजीविका करण्याची बिकट वेळ आली. त्यामुळे जुन्नरच्या नागरिकांनी सरकारकडे हा तालुका पर्यटन तालुका जाहीर करण्याचा रेटा लावल्याने, शासनाला जुन्नरकरांच्या मोठ्या संघर्षानंतर राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित करणे भाग पडले. कारण अष्टविनायक गणपतींपैकी ओझर व डोंगरावर असणारा लेण्याद्री गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, तसेच तालुक्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेतील दाट जंगल व तेथील निसर्गसंपन्नता, तालुक्यातील पाच धरणे, अनेक घाट व घाटमाथे, तसेच या पर्वतांमधील अनेक पुरातन लेणी, या सर्वांमुळे जुन्नर हा जरी पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला असला, तरीदेखील प्रत्यक्ष या पश्चिम पट्टयात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना या पर्यटन तालुक्याचा प्रत्यक्षपणे आर्थिक फायदा होत नसून, सर्वांकडेच पर्यटन केंद्रे उभारण्यासाठी पैसा व इतर सुखसुविधा नाहीत. तर याहीपेक्षा जुन्नरच्या पूर्वेकडील भागात मात्र पर्यटन केंद्रे उभारण्यास जमणार नसल्याने, कारण या भागात पर्यटक फिरकतच नसल्याने, तालुक्याच्या या भागाला मात्र खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. येथील लोकांना केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून रहावे लागत असल्याने, पूर्णपणे निसर्गावर अवलंबुन असणाऱ्या या शेती व्यवसायात शेत मालाला कधी चांगला बाजार भाव मिळतो, तर कधी मिळत नसल्याने “भारतातील शेती ही निसर्गाशी खेळला जाणारा जुगार” या भूगोलाच्या पुस्तकातील वाक्याची खरी प्रचिती येथील लोकांना प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जुन्नरकर मात्र, प्रत्यक्षात मोठ्या आर्थिक संकटात चाललेला दिसत आहे. त्यामुळे हा GMRT प्रकल्प समस्त जुन्नरकरांच्या आणि विशेषतः ज्या गावची जमीन गेलेली आहे अशा खोडदकरांच्या मुळावर बसल्याचे येथील लोक संतापाने बोलत आहेत.
त्यातच अलीकडे या प्रकल्पात नोकर भरती झाली. त्यावेळीही GMRT सोबत खोडदकरांनी अनेक बैठका घेत ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत अशा लोकांना प्रकल्प बाधीत, ज्या गावात हा प्रकल्प आहे त्या गावच्या नागरिकांना प्राधान्य, त्या नंतर तालुक्याला व नंतर तालुक्या बाहेरील लोकांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या खोडदकरांच्या मागणीचा विचार वरिष्ठ पातळीवरून केला जाईल असे आश्वासन, या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खोडदकरांना दिलेले होते. मात्र प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरच अनेक आक्षेपार्ह घटना घडल्याच्या तक्रारी खोडद व पंचक्रोशी तसेच तालुक्यातील अनेक उमेदवारांनी सांगितल्याने, खोडदकरांची तसेच तालुक्यातील उमेदवारांची घोर फसवणूक चालू असल्याची खात्री सर्वांची झाली. प्रत्यक्ष उमेदवारांनी खोडद ग्रामपंचायत तसेच खोडदच्या विविध संस्थांकडे केलेल्या तक्रारींनुसार, काही अनोळखी व बाहेरील परीक्षार्थींनी केवळ दहा मिनिटांतच परीक्षाग्रह सोडले होते, अशांची निवड कशी झाली ? या तक्रारींशिवाय अनेक गंभीर तक्रारी उपस्थित उमेदवारांनी केल्याने, या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लोकांचे म्हणणे असल्याने, सर्वांनीच या भरती प्रक्रियेला कडाडून विरोध करत, या संघर्ष समिती तयार करून GMRT विरोधात लढा सुरू केलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ प्रा. यशवंत गुप्ता तसेच प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी खोडदकरांचे ग्राम पंचायत येथे येऊन प्रत्यक्षपणे गाऱ्हाणे जरी ऐकले असले, तरी देखील हा केवळ फार्स असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे GMRT ने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत नव्यानेच जॉब कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा शिरकाव केल्याने खोडदकर आणखीनच आक्रमक झालेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शनिवार दि. 5 जुलै 2025 रोजी, खोडद येथील ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या प्रांगणातील, जगदंबा सांस्कृतिक भवन येथे सायं. 6 वा. GMRT तील स्थानिक कंत्राटी कामगार विषयक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, नोकरभरती संघर्षसमिती खोडद आणि स्थानिक कंत्राटी कामगार, ठेकेदार अशा विविध संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आली. त्यात GMRT तील सर्व ठेकेदार आणि बहुसंख्य कंत्राटी कामगार, गावातील जबाबदार लोक, संघर्ष समितीतील सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी स्थानीक कंत्राटी कामगारांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच पर्मनंट नोकर भरती बरोबरच कंत्राटी कामगार हा विषय देखील महत्वाचा असल्याने, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. कामगारांच्या आधीच जुन्या अनेक समस्या असतानाच, “जॉब कॉन्ट्रॅक्ट” ही आणखी एक गंभीर समस्या पुढे येत आहे. त्यामुळे कामगार अस्वस्थ झाले असून, जर हे जॉब कॉन्ट्रॅक्ट कामगारांच्या मुळावर येत असेल आणि ते जर त्यांच्यावर अन्यायकारक असेल, तर खोडद ग्रामस्थ आणि संघर्ष समिती याला जोरदार विरोध करेल. या संपूर्ण लढ्यात सर्व ग्रामस्थ आणि संघर्ष समिती, ही कामगार व ठेकेदार यांच्यासोबत असेल असे एकमुखाने ठरविण्यात आले.
हे सर्व करत असताना पर्मनंट भरतीमध्ये जर कामगार संख्या मर्यादित असेल, तर भविष्यात कंत्राटी कामगार भरतीमध्ये खोडदच्या उमेदवारांनाच प्राधान्याने भरती करावे, असा ठरावही या वेळी घेण्यात आला. तसेच यासारखे अनेक विषय भविष्यात GMRT कडून उभे राहण्याच्या शक्यता असल्याने,
गावच्या फायद्यासाठी सर्वांनीच एकी दाखवत, समस्त खोडद ग्रामस्थ व संघर्ष समितीने तात्काळ या संदर्भातील लेखी पत्र GMRT प्रशासनाला या बैठकीच्या ठरावातून दिलेले आहे.
त्यामुळे आता GMRT व या प्रकल्प बाधीत खोडदकरांचा संघर्ष अधिकच वाढत असल्याचा दिसत असून, खोडदकरांचे बैठकांवर बैठकांचे सत्र सुरूच असल्याने, महसूल प्रशासन व गृह विभागही अलर्ट मोड वर आलेला दिसत आहे. त्यामुळे GMRT च्या या नोकर भरतीतील घोटाळ्यांच्या आरोपांबाबत व त्यातून आलेल्या नवनवीन विषयांबाबत पुढे नेमक्या काय काय घडामोडी होणार आहेत, याकडेच संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच, आता या विभागाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी देखील यात उडी घेतल्याने, देशाच्या संसदेत ते खोडद करांचे गाऱ्हाणे मांडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, राज्यासह देशभरात हा विषय चर्चेचा बनण्याची शक्यता आहे.

