अनैतिक सबंधातून लहान भावाने मोठ्याचा केला खून

खूनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीच निघालाच खरा आरोपी

उत्तम कुटे
पिंपरीःमे महिन्यापासून शहरात सुरु झालेली खूनाची मालिका जुलैतही कायम आहे.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीच्या दुसऱ्या टप्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे खून सत्र सुरुच असून नुकताच तेथे आणखी एक निर्घूण खून नुकताच (ता.५)झाला.मेंढपाळ लहान भावाने मोठ्या भावाचा अनैतिक सबंधातून डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तो केला.पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वत फिर्याद दिली.परंतू,त्याचा हा डाव पोलिसांनी हाणून पाडला.त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचे अनैतिक संबंध त्याने मारलेल्या मोठ्या भावाच्या पत्नीशी म्हणजे त्याच्या भावजयीशीच होते.तिलाही अटक करण्यात आली.या दोघांच्या सबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांनी मिळून हा खून करीत आपल्या मार्गातील अडसर दूर केला होता.

सोमनाथ दादा लकडे (वय २१,रा.काळे कॉलनी,आळंदी रोड,चऱ्होली,मूळगाव, मानकोबावाडी, ता. दौड, जि.पुणे) असे मुख्य आरोपीचे,तर धनुदादा (वय़ ३३,रा.सदर) असे या घटनेतील मृताचे म्हणजे आरोपीच्या मोठ्या भावाचे नाव आहे.सोमनाथचे लग्न झालेले नाही.दोन्ही लकडे भाऊ एकत्र राहत होते. मेंढपाळाचा व्यवसाय असल्याने ते फिरतीवरच असायचे.सध्या त्यांचा मुक्काम चऱ्होलीत होता.सोमनाथचे त्याची मोठी वहिनी शीतल हिच्याशी अनैतिक संबध होते.त्यात भावाचा अडसर येत होता.तसेच त्यालाही हे सबंध समजले होते. त्यामुळे या दीर-भावजयीने आपल्या मार्गातील हा अडथळा दूर करण्याचे ठरवले.त्यानुसार सोमनाथने आपल्या मेंढ्या हरवल्याचा बनाव ४ तारखेच्या रात्री केला.तसे आपला मोठा भाऊ धनुदादाला सांगितले.त्यामुळे ते दोघे मेंढ्या शोधायला त्या रात्रीच बाहेर पडले. ठरलेल्या प्लाननुसार सोमनाथने कुऱ्हाड लपवून बरोबर घेतली होती. पठारेमळा येथील प्राईड वर्ल्ड सिटी जवळ बेसावध धनुदादाच्या डोक्यात त्याने ती मागून मारली.तिचे अनेक घाव घातले.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर आपल्या भावाला मारले म्हणून सोमनाथनेच दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

खूनाचे गु्न्हे वाढू लागल्याने व त्यात पुन्हा हा आणखी निर्घूण खून झाल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याचा समांतर तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी तसेच गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुक्रमे संतोष पाटील व राजेंद्र पवार आणि त्यांचे पथक चौकशी करीत होते.त्यांनी सीसीटीव्ही तपासले.त्यातून गुंडा विरोधी पथकातील हवालदार चव्हाण यांना हा खून फिर्यादीनेच केल्याची माहिती मिळाली. तसेच त्याबाबत त्याने स्वत फिर्याद दिली असल्याने पोलिस आपल्या मागावर येणार नाही,यातून तो घरीच निर्धास्त होता.तेथेच त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर त्यात सामील असलेल्या त्याच्या भावयजीलाही खंडणी विरोधी पथकाने अटक केली.खंडणी व गुंडा विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कामगिरी केली.त्यांनी नंतर दोन्ही आरोपींना स्थानिक दिघी पोलिसांच्या ताब्यात दिले .