रवींद्र खुडे विभागीय संपादक
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तसेच पुणे ग्रामीण पोलिस अंतर्गत येणाऱ्या, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे मांडवगण फराटा येथील, पोलीस औट पोस्ट येथे कार्यरत असणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल संपत खबाले यांच्या एका स्तुत्य कामाची गावात व पंचक्रोशित सध्या खूप चर्चा सुरू असून या पोलिस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मांडवगण फराटा येथील रहिवासी असलेले तथा आदिवासी समाजातील एक कार्यकर्ते, हिरालाल संपतलाल भोसले यांनी येथील पोलिस औट पोस्ट मध्ये कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संपत खबाले यांना, त्यांच्या मुलीच्या शिक्षणाविषयी माहिती देत, तसेच तिला शिक्षणाची आवड आहे परंतु शाळेत जाण्या येण्यासाठी सायकलची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे कु. आर्या भोसले हिच्या शिक्षणातील अडथळा दूर करण्यासाठी व हिरालाल भोसले यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, पोलिस कर्मचारी खबाले यांनी एक नवीन सायकल या विद्यार्थिनीला स्वतः विकत घेऊन शुक्रवार दि. ०४/०७/२०२५ रोजी दिली. ही नवीकोरी सायकल स्वीकारताना या गरजू विद्यार्थिनीच्या डोळ्यात आनंदाश्रु व मुखात आभार व्यक्त होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
एरव्ही पोलिस म्हटले की त्यांच्या खाकीचा धाक, त्यांचा राग आणि माणुसकी नसलेला व्यक्ती एवढीच त्यांची ओळख दिसते. तर काही प्रसंगी बदनामीचा डागही या सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांवर पाहायला मिळतो. परंतु याही पलीकडे त्यांची माणुसकी मात्र दडलेली दिसून येत नाही. अनेक पोलिस कर्मचारी या ना त्या मार्गे सत्कार्य करत असतात, परंतु सर्वच गोष्टी बाहेर येत नाहीत. याच पद्धतीने अनेक लोक देखील सत्कार्य करतच असतात, परंतु त्यांच्याही सर्वच सत्कार्याचा ऊहापोह होत नसतो. समाजात दानशूर व्यक्ती आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत संबंधितांची गरज प्रकर्षाने जाणे गरजेचे असते.
खरे तर हिरालाल भोसले यांनी पोलिस कर्मचारी यांना नवीन सायकल मागितली नव्हती. तर त्यांच्याकडे असणारी जुनी सायकल दुरुस्त करणार असल्याचा केवळ अनौपचारिक पद्धतीने व गप्पा गोष्टी करताना व सहजपणे विषय काढलेला होता. परंतु कु आर्या हिरालाल भोसले, ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थीनी दररोज ३ किलोमीटर शाळेत पायी ये जा करतेय व तिला खरोखरच सायकलची नितांत आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानेच, खबाले यांनी तिला नवीन सायकल खरेदी करून देण्याचे ठरविले. कारण एका आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्याची गरजू विद्यार्थिनी जर चांगली शिकली, तर कदाचित ती पुढे जाऊन चांगल्या नोकरीला लागून भविष्यात आपल्या पायावर उभी राहू शकते असा विचार या पोलिस कर्मचाऱ्याच्या मनात आला असावा.
मात्र या सायकल भेटीमुळे कु. आर्या हिस मोठा दिलासा मिळाला असून, तिचा जाण्यायेण्याचा वेळ वाचून अभ्यासासाठी अधिकचा वेळ तीला आता मिळणार आहे. त्यामुळे आर्याला नक्कीच या गोष्टीचा फायदा होऊन ती चांगली शिक्षण घेईल असे मत तिचे वडील हिरालाल भोसले यांनी व्यक्त केलेय. तसेच सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदय यांचा कालखंड संपुष्टात आल्याने, अशा अनेक ठिकाणांवर प्रशासक असल्याने शासकीय योजना मिळणे कठीण होत असल्याचे हिरालाल भोसले यांनी यावेळी सांगितले. अन्यथा आम्हाला शासकीय योजनेतूनही सायकल मिळाली असती. त्यामुळे लवकरात लवकर या शासकीय योजना कार्यान्वित करून आमच्या सारख्या गरिबांना न्याय मिळावा असेही त्यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना स्पष्ट केले.
मांडवगण येथे सायकल देतावेळी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, पोलीस हवालदार बाळू भवर, मांडवगण पोलीस स्टेशन मधील कर्मचारी पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब टेंगले, पोलिस कॉन्स्टेबल किशोर वाघ, इतर कर्मचारी तसेच हिरालाल भोसले, कु. आर्या व कुटुंबीय देखील उपस्थित होते.
शिरूरचे ऊपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) प्रशांत ढोले, तसेच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी देखील पोलिस अंमलदार संपत खबाले यांच्या स्तुत्य कार्याचे कौतुक केले आहे.

