आय़टी पार्क हिंजवडीसह सात गावे पिं.चि.मनपा त सामील होण्याची शक्यता

आ.शंकर जगतापांच्या समावेशाच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

उत्तम कुटे
पिंपरीःमुलभूत नागरी सुविधा देऊ शकत नसल्याने आयटी पार्क हिंजवडी ग्रामपंचायतीसह लगतच्या सात गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्याच्या मागणीने पुन्हा जोरात उचल खाल्ली असून यावेळी तिला स्थानिक आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिल्याने तो होईल,असे संकेत मिळाले आहेत.चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यवाहीचे आदेश दिल्याने या समावेशाची शक्यता बळावली आहे. नगरविकास खाते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याने हा समावेश झाल्याचीच आवई सोमवारी (ता.७) उद्योगनगरीत उठली होती.

हिंजवडीसह माण,मारुंजी,नेरे,जांबे (ता. मुळशी),सांगवडे व गहुंजे(ता. मावळ)या सात गावांच्या शाश्वत विकासासाठी ती पिं.चि.मनपा त समाविष्ट करण्याची मागणी पत्राव्दारे आ.जगताप यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ५ तारखेला केली.त्यावर वरील आदेश या दोघांनी दिला.दरम्यान,आमदारांच्या या मागणीला मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचेही बळ मिळाले.त्यांनी आमदार जगतापांसह सोमवारी या मागणीसाठी फडणवीस आणि शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या गावांचा समावेश करण्याचा ठराव २०१८ मध्येच पिं.चि.मनपा ने संमत करून तो राज्य सरकारकडे पाठविला असून तो प्रलंबित आहे.आयटी पार्क असलेल्या हिंजवडी व परिसराचा विकास ग्रामपंचायतीच्या क्षमतेबाहेर गेल्याने मुलभूत सुविधा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध नागरीकरणाकरिता या गावांचा तातडीने पिं,चिं. मनपा त समावेश होणे अत्यावश्यक आहे,असे आ.जगताप म्हणाले.तसेच त्याबाबत निर्णय त्वरित व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्याला लवकरच मूर्त स्वरूप मिळेल,असा विश्वास त्यांनी सोमवारी व्यक्त केला.

हिंजवडीसह सात गावे पिं.चि. मनपा त घेण्यामागील कारणमिमांसा करताना खा.बारणे म्हणाले,या गावांची जबाबदारी पीएमआरडीएकडे असून त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे.ते बांधकामावर नियंत्रण ठेऊ शकत नसल्याने या परिसराला बकालपणा आला आहे.वाढते नागरीकरण,सुविधांचा अभाव,वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करता ही गावे पिं.चि. मनपा त येण्याची आवश्यकता आहे.गहुंजेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असून या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते आहे.परिणामी पवना नदीचे प्रदुषण वाढले आहे.या गावांचा विकास,तेथे सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून ही गावे मनपा हद्दीत करण्याची मागणी आहे.