उत्तम कुटे
पिंपरीःमावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे दोन वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात सराईत गुन्हेगारांची धरपकड करीत त्यांच्याकडून नऊ पिस्तूले आणि ४२ काडतूसे असा मोठा बेकायदेशीर शस्त्रसाठा हस्तगत केला होता.राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता.त्यानंतर मावळात पुन्हा आणि ती ही तळेगाव दाभाडेतच आणखी दोन देशी बनावटीची अवैध पिस्तूले आणि त्याची दोन काडतुसे स्थानिक पोलिसांनी रविवारी (ता.६)जप्त केल्याने हा परिसर पिस्तुले तस्करीचे मोठे केंद्र बनल्याचे दिसून आले आहे.
प्रशांत शांताराम आंबेकर ऊर्फ पैलवान (वय २६,रा.देवळे,ता.मावळ,जि.पुणे) आणि ओंकार बाळू भारती (वय २२,रा. कासार आंबोली,ता.मावळ) अशी पिस्तूले मिळालेल्यांची नावे आहेत.ते सराईत गुन्हेगार असून प्रशांतविरु्द्ध खून,अपहरण यासारखे चार गंभीर गुन्हे लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहेत.तर,ओंकारविरुद्ध दरोड्याचा गुन्हा पुणे ग्रामीण मध्येच पौड पोलिस ठाण्यावर दाखल आहे.या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सोमवारी दिली.शहर व परिसरात मध्यप्रदेशातून पिस्तुलांची तस्करी होत असल्याचे यापूर्वीच पोलिसांच्या तपासात आढळले आहे.त्यामुळे ही पिस्तुले सुद्धा तिकडूनच आली आहेत का याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.ती पकडून मोठा गंभीर गुन्हा टाळल्याचा दावाही त्यांनी केला.मात्र,तो कुठला,कशासाठी आरोपींनी ही पिस्तुले जवळ बाळगली होती,याचाही शोध आता ते घेत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात घडत असलेल्या गुन्ह्यांत गावठी पिस्तुलांचा वापर दिसल्याने त्यांचा छडा लावण्याचा आदेश पोलिस आयुक्त (सीपी) विनयकुमार चौबे यांनी दिला होता.त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिस या मोहिमेत सामील झाले होते.त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील (डीबी) उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांना घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला दोघेजण पिस्तूल घेऊन बसले आहेत,अशी खबर(टीप)रविवारी (ता.६) मिळाली.त्यावर लगेच त्यांनी आपल्या पथकासह तेथे जाऊन या दोघांची धरपकड केली,तेव्हा त्यांच्याकडे दोन पिस्तूले आणि दोन काडतुसे मिळाली.

