पिं.चि.मनपा ची ११२ कोटीची प्रणाली तीन महिन्यातच गंडली अन बंद पडली

प्रणालीची निविदा व खर्चातही गोलमाल झाल्याचा मारूती भापकारांचा आरोप

प्रतिनिधी
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेने 112 कोटी खर्चून 1 एप्रिल 2025 पासून सुरू केलेली दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (डीएमएस)तीन महिन्यातच नुकतीच (ता.1) बंद पडल्याने महापालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले.त्यामुळे हा खर्च संशयास्पद असून या कामाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नगरविकास खाते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे रविवारी (ता.६) केली.हे काम मुंबईतील भाजप आमदाराच्या एजन्सीला दिल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

११२ कोटीची ही यंत्रणा अवघ्या तीन महिन्यात गंडल्याने महापालिका अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.तसेच तीत सातत्याने अडचणी येत असून काम जलद होण्याऐवजी ते विलंबाने होत असल्याने अधिका-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे,असा दावा भापकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.महापालिका प्रशासनाने कागदविरहित कारभारासाठी ही कामकाजाची नवी पद्धत सुरू केली.त्यासाठी डीएमएस आणि (डब्ल्यूएफ)कार्यप्रवाह प्रणाली वापरण्यास सुरूवात केली.यासह एकूण 33 अशा संगणक प्रणाली विकसित केल्या.विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा प्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले.एक हजार 709 डिजिटल स्वाक्षरी ‘की’ तयार करण्यात आल्या.या संपूर्ण प्रणालीवर 112 कोटींचा खर्च करण्यात आला असून तो संशयास्पद आहे,असा मोठा आरोप भापकर यांनी केला आहे.

महापालिकेच्या सर्व प्रकारच्या नस्ती (फाईल्स) तयार करण्यासाठी डीएमएस आणि डब्ल्यूएफ प्रणालीचा वापर केला जात आहे.मात्र,डीएमएस प्रणालीत वारंवार व्यत्यय येत असून एक फाईल सबमिट करण्यासाठी दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागतो आहे. इंटरनेट आणि वीज पुरवठा खंडीत झाल्यावर,तर नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते.त्यातइंटरनेटला पाहिजे तेवढी गती नसल्याने कामकाज वेळेत पूर्ण होण्याऐवजी त्याल उशीर होत असल्याचे भापकर यांचे म्हणणे आहे.महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आग्रहाखातर डीएमएस प्रणाली मोठा गाजावाजा करित सुरू केली गेली. हे काम मुंबईतील एका भाजप आमदाराच्या एजन्सीला देण्यात आले आहे,अशी चर्चा आहे.ते सुरू झाल्यापासून त्यात अडथळे येत आहेत. अधिक क्षमतेची फाईल अपलोड होत नाही.ही सिस्टीम दोन दिवसांपासून बंद पडल्याने तिच्यावर झालेल्या खर्चात गोलमाल झाल्याचा आरोपह भापकरांनी केला आहे.त्यामुळे या प्रणालीची निविदा प्रक्रिया कशी राबवण्यात आली,एकूण किती निविदा आल्या होत्या,त्यांचे दर काय होते, मंजूर निविदा काय दराची होती, हे काम करणारी एजन्सी मुंबईच्या भाजप आमदाराची आहे किंवा कसे, त्यामध्ये आयुक्तांचा काय सहभाग आहे, डीएमएस प्रणाली ठप्प होऊन झालेले महापालिकेचे नुकसान भरपाई संबंधित ठेकेदाराकडून घेतली जाणार किंवा कसे, ही प्रणाली सुरळीत चालणार का पुढच्या काळात ही वेळोवेळी अशीच ठप्प होणार या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी होऊन यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे.