लातूर जिल्ह्यात झाली अनुकरणीय आणि आदर्शवत अशी वाटणी

उत्तम कुटे
पिंपरीःशेत जमिनीसह इतर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी हा ग्रामीण भागात मोठा कळीचा मुद्दा आहे.ती कशी करायची,कोणी काय घ्यायचे यावर भावाभावात आणि भाऊबहिणीत अनेकदा एकमत होत नसल्याने शेवटी गावपंचायत बसवून ती करण्याची पाळी य़ेते.कधी त्यावरून मोठा वाद होऊन कोर्टकचेरी होते.तर,कधी,तर ही वाटणी शेवटचे टोकही गाठते.पण,एका भावाने,जरी समंजसपणा दाखवला वा शिक्षणामुळे तो दाखवला,तर ही वाटणी कशी आदर्श घेण्याजोगी अनुकरणीय ठरू शकतो,हे परभणी जिल्ह्यातील प्राध्यापक दोन भावांनी नुकतेच दाखवून दिले. त्यामुळे महिनाही न झालेली त्यांची ही वाटणी सोशल मिडियातही मोठा चर्चेचा विषय ठरली.त्यांच्या या वाटणीचा आदर्श इतरांनी घेतला,तर भाऊबंदकीचे बहूतांश वाद होणारच नाहीत.

जगात जर्मनी,तर महाराष्ट्रात परभणी असे म्हटलं जातं. त्याला साजेशी कामगिरी या जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव या गावातील दहिफळे बंधूंनी करून दाखवली आहे.त्याबाबत प्रा.डॉ.बाळासाहेब रंगनाथ दहिफळे यांनी लातूर येथून आपला आवाज ला थोड्या वेळापूर्वी त्यांच्या वाटण्यांची माहिती दिली.भाऊबंदकी कशी जपली हे सांगितले.त्यांच्या कुटुंबात सर्वात मोठी बहिण. त्यानंतर ते स्वत ,तीन नंबरला केशव तर सर्वात लहान युवराज हा भाऊही.हे संपूर्ण कुटुंब सांप्रदायिक आहे.बाळासाहेब व युवराज हे प्राध्यापक असून त्याजोडीने युवराज हे हरी भक्त परायण (हभप) म्हणजे किर्तनकारही आहेत.सुरवातीला दहा वर्षे बाळासाहेब आपल्याच जिल्ह्यात सोयगाव येथे बाळासाहेब प्राध्यापक होते. नंतर ते सर्वात लहान तथा धाकटा बंधू युवराजसह लातूरला आले. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक आहेत.तर,युवराज हे तेथील छत्रपती शाहूमहाराज
कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी शिकवितात.त्यांचा मधला भाऊ केशव हा सुद्धा पदवीधर असून नोकरी न मिळाल्याने तो गावी शेती पाहतो.

दहिफळे बंधूंचे वडील रंगनाथ हे आता नव्वदीत आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या डोळ्यादेखत जमिनीची वाटणी भावाभावात करून घ्या असे आपल्या मोठ्या मुलाला सांगितले.वडिलांची आज्ञा त्यांनी अंमलात मानली.वाटणी केली.१६ एकर शेतजमिनीतील फक्त तीन तीन एकर शेती दोन्ही वेल सेटल्ड उच्चशिक्षित प्राध्यापक दहिफळे बंधूंनी घेतली,तर उर्वरित दहा एकर शेत ती कसणारा गावी असणारा केशव याला दिले.गावचे घरही त्यालाच दिले.कसलाही वाद न होता झालेल्या या वाटणीची पंचक्रोशीत चर्चा झाली नसती, तर नवलच.तसेच शेतीवर असल्याने तुलनेने आर्थिक स्थिती बेताचीच असलेला आपला लहान भाऊ केशवच्या मुलाला त्याचे चुलते प्रा.बाळासाहेब यांनी शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवले.केशवच्या मुलीचे लग्नही ते दुसऱ्या प्राध्यापक भावाच्या मदतीने लावून देणार आहेत.त्याबद्दल आपला आवाज शी बोलताना प्रा. बाळासाहेब दहिफळे म्हणाले,सध्या शेती ही बेभरवशाची झाली आहे.वाढलेली पिके जनावरे नष्ट करतात.त्यांच्या तावडीतून ती राहिली,तर त्याला किमान भावही मिळत नाही.त्यामुळे जगाचा पोशिंद्याचे खर्च आणि उत्पनाचे गणित फिस्कटते.अशाप्रकारे शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होते.मागूनही त्याला भाव मिळत नाही.दुसरीकडे न मागता बहि‍णींना भाऊबीज की ओवाळणी दिली जाते.म्हणून शेतकरी भावाला आम्ही दोघा प्राध्यापक भावांनी जास्त जमिन दिली.त्याच्या मुला-मुलीचा खर्च उचचला.ते दुसरे कोणी नाही,तरप आमचे रक्ताच्या जवळच्या नात्यातलेच आहेत.त्यांच्या पत्नींनी तेवढाच समंजसपणा दाखवत यात मोठा वाटा उचलला,हे ही खूप महत्वाचे आहे.