आय टी पार्क चे वॉटर पार्क करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल,पण का झाली नाही एकालाही अटक?

उत्तम कुटे
पिंपरीःहिंजवडी आयटी पार्क चं या पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात वॉटर पार्क झाल्यानंतर प्रशासन (पीएमआरडीए) आता खडबडून जागे झाले असून त्यांनी प्रतिबंधात्मक उपायांबरोबर कारवाईही सुरु केली आहे.नाले बुजवून तेथे अनधिकृत बांधकामे केल्याने ही आफत हिंजवडीवर आली.त्यामुळे नाले अडवून तेथे असे बांधकाम केलेले चार जागा मालक आणि त्या जागेत व्यवसाय करणारे अशा आठजणांविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला.त्यापूर्वी तीन दिवस अगोदरच पीएमआरडीए आय़ुक्त डॉ.योगेश म्हसे यांनी सदर भागाची पाहणी करून अशी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.तो त्यांनी खरा करून दाखवला.

आयटी पार्क च्या दुरावस्थेमुळेच हिंजवडीच नाही,तर लगतची सात गावे सुद्धा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीने सध्या पुन्हा जोर धरला आहे.त्यासाठी आयटीएन्स नी सह्यांची मोहीम सुरु केली असून त्याला चिंचवड आणि भाजपचे आमदार अनुक्रमे शंकर जगताप आणि महेश लांडगे यांनी पाठिंबाही दिला आहे.समावेश करण्याचा हा मुद्दा सध्या सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आ.लांडगे यांनी सांगितले आहे.त्यावर सरकारची कोंडी होण्यापूर्वीच प्रशासन हालले.त्यांनी एफआयआर दाखल करण्यास सुरवात केली.त्यातून काल एका दिवसात असे चार गुन्हे एकाच पोलिस ठाण्यात नोंद झाले.भारतीय दंड संहितेची जागा घेतलेली भारतीय न्याय संहिता,पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि जल प्रदूषण कायदा १९७४ या तीन कायद्यांच्या विविध कलमांनुसार ते दाखल करण्यात आले.मात्र,त्याची तीव्रता तेवढी नसल्याने त्यातील आरोपींना अटक झालेली नाही.ती केली,तरी त्यांची लगेच जामिनावर सुटका होणार आहे.चारपैकी एका गुन्ह्यात
शशिकांत साखरे (जागामालक) आणि विठ्ठल मोनाजी त़़डकेवार (विकसक, गुरुकृपा बॅन्गल स्टोअर) हे दोघे आरोपी आहेत.

आयटी पार्क ला अपुरे रस्ते,अतिक्रमणे या नागरी प्रश्नांसह वाहतूक कोंडीही मोठी भेडसावते आहे.हिंजवडी,माण आणि मारुंजी या आयटी पार्क असलेल्या भागातील या नागरी समस्यांसह वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकतीच (दि.१)तेथे पाहणी केली.त्यात त्यांना हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात १३ ठिकाणी ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल / अडवल्याचे दिसले. तसे करणाऱ्यांना त्यांनी लगेच नोटिसा दिल्या. प्रवाह मोकळे करण्यास सांगितले.त्यायासंबंधी अहवाल आल्यानंतर पाण्याचा प्रवाह खुला न केलेल्या वरील आठजणांविरुद्ध तक्रार देण्यात आली.त्यानुसार त्यांच्याविरुद्ध वरील गुन्हा काल दाखल झाला.