फडणवीसांचा आता दीडशे दिवसांचा कृती आराखडा,सरकारी खाती लागली पुन्हा कामाला

येत्या पाच महिन्यांत सर्व शासकीय सेवा शंभर टक्के ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः गेल्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत महायुती राज्यात पुन्हा सत्तेत आली.अगोदरच्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले.त्यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा लगेच जाहीर केला.त्यात काही निकष ठरवून देण्यात आले.त्यानुसार मंत्रीच नाही,तर सर्व सरकारी विभाग कामाला लागले.ही मोहीम फत्ते झाल्यानंतर फडणवीसांनी आता दीड़शे दिवसांचा कृती आराखडा घोषित केला.त्यानुसार लगेचच पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे.

नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे हा नव्या कृती आराखड्याचा उद्देश आहे.विकसित महाराष्ट्र २०४७, प्रशासकीय सेवा सुधारणा आणि ई गर्व्हनन्स सुधारणा हे त्याचे तीन मुख्य घटक आहेत.त्यातील पहिल्या घटकात राज्य विकसित होण्याकरिता २०२९,२०३५ आणि २०४७ या टप्यांसाठी धोरणात्मक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.तर,नागरिकांना शासकीय कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये यासाठी सर्व शासकीय सेवा शंभर टक्के ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

२०४७ पर्यंत भारत देश विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठरवले आहे.त्यात आपला वाटा उचलण्यासाठी महाराष्ट्रानेही २०४७ पर्यंत विकसित राज्य व्हायचे निश्चीत केले आहे.त्यासाठीच हा दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे.त्यात प्रगत,समावेशक आणि शाश्वत विकास करणारे राज्य बनविण्याचा हेतू या आराखड्यामागे राज्य सरकार तथा फडणवीसांचा आहे.त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन हे अधिक लोकाभिमूख,जबाबदार,उत्तरदायी,पारदर्शक,गतिमान, परिणामकारक करण्यासाठी सर्व विभागांनी तत्पर कामाला लागण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी काल काढला आहे.