उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वोच्च सिग्नल मिळताच झाडून सारे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातून दुभंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी तसेच ठाकरे शिवसेना-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे.त्यातही ठाकरे गट-मनसे म्हणजे दोन्ही ठाकरे चुलत बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) हे त्याबाबतीत अधिक सकारात्मक दिसत असल्याने ते एकत्र येण्याची शक्यता अधिक दिसते आहे.त्याचा फायदा या दोघांपैकी कोणाला जास्त होईल, हे आज आपण जाणून घेऊयात.
े
राजकीय परिस्थितीच सध्या अशी निर्माण झाली आहे की एकत्र येण्याशिवाय ठाकरे बंधूंना तरणोपाय राहिलेला नाही.कारण प्रथम पक्ष फुटल्याने व नंत विधानसभेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने उद्धव ठाकरे बॅकफूटवर गेले आहेत.त्यांना आता मनसे ची दिल से गरज वाटू लागली आहे. दुसरीकडे, मनसे ची पाटी गत विधानसभेला कोरी झाली.त्यांच्या एकमेव आमदारांचा पराभव झाला.,स्थापनेनंतरचे त्यांची म्हणजे राज ठाकरेंच वलय तथा क्रेझ संपली.आमदारांची संख्या कमी होत जाऊन ती शून्यावर आली.तसेच महापालिका निवडणुकीतही घडले. नाशिक महापालिकेतील त्यांची सत्ता गेली.पिंपरी महापालिकेतील त्यांच्या नगरसेवकांची संख्या चारवरून (२०१२) २०१७ ला एकवर आली.अशाप्रकारे राज ठाकरे यांचे वलय कमी होत गेले. त्यातून त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी आता ठाकरे गटाची गरज आहे.त्यातूनच दोन्ही पक्षांचे प्रमुख असलेल्या उद्धव आणि राज यांनी पुन्हा एकत्र य़ेत पुढे जाण्यासाठी काही पावले मागे येण्याचे ठरवले आहे.दोघांच्याही राजकीय भविष्याचा विचार करता त्यांना पुन्हा टाळी द्यावीच लागणार अशी राजकीय परिस्थितीच सध्या निर्माण झालेली आहे.
वरील कारणांतून ठाकरे बंधू एकत्र आले,तर पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे ला उबाठा शिवसेनेपेक्षा काकणभर जास्तच फायदा होणार आहे.कारण पक्ष फुटल्यानंतर उबाठा शिवसेना शहरात खूपच दुबळी झाली आहे.त्यांचे तालेवार नेते व बहूतांश माजी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून स्थानिक खासदारही शिंदेंचाच आहे.त्यात त्यांची महायुती झाली,तर ठाकरे गटापेक्षा शिवसेनेचे नगरसेवक हे अधिक निवडून येण्याची शक्यता आहे.दुसरीकडे मनसे त ठाकरे गटासारखी पडझड वा आऊटगोईंग झालेले नाही.त्याचा फायदा त्यांना पिंपरी मनपा निवडणुकीत मिळू शकतो.तसा तो ठाकरे गटाला मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबीवली,वसई- विरार महापालिकात होऊ शकतो. त्यातही गेल्यावेळी २०१७ ला थोडक्यात हाती आलेली मुंबई महापालिकेतील सत्ता टिकविणे हे त्यांच्य़ापुढे आता मोठे आव्हान असल्याने बुडत्याला काडीचा आधार ही मोलाचा ठरणार आहे.दुसरीकडे उद्योगनगरीत ठाकरे शिवसेनेची साथ मिळाली,तर मनसेची ताकद वाढून त्यांचे एकाचे चार नगरसेवक पुन्हा होऊ शकतात. अशीच ताकद त्यांची मुंबई आणि लगतच्या महापालिकांत या युतीमुळे वाढू शकते.एकूणच सध्या वाईट दिवस आलेली मनसे व ठाकरे शिवसेना हे एकत्र आले,तर दोघांनाही ते फायदेशीरच ठरणार आहे.

