उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःशहरात पर्यावरणपूरक विकास प्रकल्प राबविण्यासाठी हरित कर्ज रोख्यांतून (ग्रीन बाँड) सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी नुकताच पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभा केला.हे हरित कर्ज रोखे इश्यू करणारी पिंपरी ही राज्यातील पहिली,तर देशातील चौथी महापालिका आहे.या बाँडचे समारंभपूर्वक लिस्टींग (बेल रिगींग सेरेमनी) मुंबई शेअर बाजारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (ता.१०) सकाळी दहा वाजता होणार आहे.शेअर बाजारात लिस्ट होणारी पिंपरी ही राज्यातील पहिलीच महापालिका आहे,असे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज ला सांगितले.
या हरित रोख्यांअगोदर २०२३ मध्येही पिंपरी महापालिकेने दोनशे कोटी रुपयांचा निधी नॉर्मल बॉण्डमधून उभा केला होता. त्यावेळी महापालिकेवर मोठी टीका झाली होती.कारण एकेकाळी आशिय़ा खंडात श्रीमंत असा तिचा लौकिक होता.पण,तो नंतर संपला.त्यातही २०१४ ला भाजप प्रथमच महापालिकेत सत्तेत येताच तिच्या श्रीमंतीला ग्रहण लागले अशी टिका झाली. तर,बाजारात पत असल्याने या रोख्यांव्दारे निधी उभारला,असा बचाव त्यावेळी महापालिका प्रशासनाने केला होता.तो सूर अजूनही कायम आहे.त्यातूनच हरित कर्जरोख्यातून आणखी दोनशे कोटी रुपयांचा निधी पिंपरीमहापालिकेने गोळा केला. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागल्यानंतरच हे कर्ज रोखे जारी करण्याचा निर्णय झाला,हे विशेष.जर, महापालिका सभागृह अस्तित्वात असते,तर बहुधा त्याला विरोध झाला असता,असे जाणकारांचे म्हणणे आहे.
७.८५ टक्के व्याजदर असलेले हे हरितरोखे पाच वर्षासाठी आहेत.ते इश्यू सुरु होताच एका मिनिटात शंभर कोटी रुपये जमा झाले.तर, एकूण मागणीच्या पाचपट प्रतिसाद गुंतवणुकादारांनी त्याला दिला.या यशस्वी इश्यूमुळे केंद्र सरकारकडून पिं.चि.मनपा ला वीस कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तर,या रोख्यांच्या निधी म्हणजे दोनशे कोटी रुपये निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि टेल्को रस्ता विकास प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.

