उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला गेल्या महिन्याच्या सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल देताच लगेच भाजपने आपले राज्यातील ७८ जिल्हाध्यक्ष १३ मे रोजी जाहीर केले.त्यात पिंपरी-चिंचवड,पुणे शहर आणि उत्तर पुणे (मावळ)जिल्हाध्यक्षांचा समावेश होता.त्यानंतर काही दिवसांत दक्षिण पुणे (बारामती)सह उर्वरित २२ जिल्हाध्यक्ष घोषित केले.पण,एकाही जिल्ह्याची कार्यकारिणी नवीन अध्यक्षांनी पदभार स्विकारून तीन आठवड्यानंतरही अद्याप जाहीर झालेली नाही.ती येत्या पंधरवड्यातही घोषित होणार नाही.कारण त्याला राज्य पातळीवरूनच ब्रेक लावण्यात आलाय.पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिण्या स्थापन होऊन त्यांची घोषणा केली जाणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महायुती २ सरकारमध्ये महसूलमंत्री झाल्याने नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.दुसरीकडे पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्य़क्ष सुद्धा मिळणार आहे.परंतू,या दोन्ही नियुक्त्या रखडल्या आहेत.महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदी सध्याचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचीच नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.येत्य़ा आठवड्यात ती होईल,असे पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले.त्यानंतर जिल्हा कार्यकारिण्या स्थापन करण्यास हिरवा कंदिल दिला जाणार आहे,असे ते म्हणाले. तोपर्यंत त्या घोषित करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी आपला आवाज ला थोड्या वेळापूर्वी दिली.त्यातून भाजपचा प्रदेशाध्यक्ष जाहीर न झाल्याने पक्षाच्या नव्या जिल्हाध्यक्षांनी घोषित होऊन त्यांनी पदभार घेऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही त्यांना आपापली कार्यकारिणी जाहीर करता आलेली नाही.म्हणजेच नव्या प्रदेशाध्यक्षांचा या कार्यकारिण्यांवर वरचष्मा राहणार वा त्यांच्या परवानगीनेच त्या अस्तित्वात येणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
वरील कारणामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये नवनियुक्त अध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांनी १६ मे रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर तीन आठवड्यांनीही त्यांना आपली कार्यकारिणी जाहीर करता आलेली नाही.त्यासाठी अनेक जणांनी प्रदेश पातळीवर फिल्डींग लावली आहे.कारण हीच कार्यकारिणी दिवाळीनंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीला सामोरी जाणार आहे.त्यामुळे त्यावर वर्णी लागावी,यासाठी जुन्या,नव्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांकडेही मोर्चेबांधणी केली आहे.दुसरीकडे मनपा निवडणूकही येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.तिच्या तयारीसाठी नव्या टीमला पुरेसा अवधी मिळावा असा एक मतप्रवाह शहर भाजपमध्ये आहे.मात्र,वरील कारणामुळे भाजपची नवीन शहर कार्यकारिणी ही किमान १५ दिवसांत,तरी स्थापन होऊन जाहीर होणार नाही,अशीच चिन्हे सध्या,तरी आहेत.

