दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांच्य़ा सॅकने केला घात,दोन लोकलचा झाला अपघात

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः मध्य रेल्वेवर ठाण्याच्या अलिकडील दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी दोन लोकल ट्रेन एकमेकांना घासून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवासी खाली पडून मृत्य पावल्याचे कळते.वळणावर दोन ट्रॅकमध्ये असलेल्या कमी जागेत या दोन लोकल एकमेकांना घासल्याने पहिल्यांदाच हा अपघात झाला. त्यातून मध्य रेल्वेच नाही,तर मुंबईतील पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी (पीक अवर)जीव मुठीत घेऊन किड्यामुंग्यासारखा प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा सुरक्षेचा प्रश्न पु्न्हा ऐरणीवर आला आहे.दरम्यान,सकाळी कामावर निघाल्याने प्रचंड गर्दी असलेल्या लोकलच्या दरवाज्यात (फूटबोर्ड)लटकणाऱ्या प्रवाशांच्या सॅक दुसऱ्या लोकलच्या प्रवाशांना लागून दहा प्रवासी खाली पडल्याचे समजले.खूप वेळ ते तसेच ट्रॅकवर पडून राहिल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने त्यातील काहींचा मृत्यू झाला.

दरम्यान,या भीषण अपघातानंतर मध्य रेल्वेला उशीराचे शहाणपण सुचले असून आता त्यांनी नवीन लोकल (उपनगरीय गाड्या तथा रेक) दरवाजे ऑटोमॅटिक बंद होणाऱ्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईच नाही,तर उपनगरासह ठाणे,रायगड जिल्ह्यांतील कर्जत,कसारा,पनवेल,विरारपर्यंतचे लाखो प्रवासी हे लोकलनेच प्रवास करतात. तर,मुंबईतील प्रवासी त्यासाठी बेस्ट या सार्वजनिक बस सेवेला प्राधान्य देतात.मात्र दीड कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईसाठी या दोन्ही सेवा अत्यंत अपुऱ्या पडत असल्याने त्यावर मोठा ताण य़ेतो आहे.परिणामी या दोन्ही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत गाड्यांना गर्दीच असते.या गर्दीनेच आज घात केला.एरव्ही लोकलच्या दरवाज्यात लटकणारे व स्टंट करणारे काही तरुण प्रवाशी हे ट्रॅकजवळच्या विजेच्या खांबाला धडकून बळी पडतात.पण.आजचा अपघात त्यापेक्षा भयानक झाला. दोन्ही लोकल एकमेकांना प्रवाशांची प्रचंड गर्दी व त्यातही त्यांच्या बॅगांमुळे (सॅक)घासल्या गेल्या.त्यामुळे एक नाही,तर दरवाजात लटकणारे अनेक प्रवासी खाली पडले.

या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.त्यातही पवार यांच्या शोक संदेश हा बोलका आहे.त्यांनी लोकलने प्रवाशांची नेमकी सुरक्षा मांडली. लोकलची गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.लोकल सेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल,असा आशावादही व्यक्त केला. दरम्यान,मध्य रेल्वे प्रशासनालाही प्रथम हा अपघात नेमका कसा झाला,हे प्रथम कळलेच नाही.अपघात झाला त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी तथा बोरीबंदर,मुंबई) येथून पुष्पक एक्सप्रेस सुटली होती.ही आणि कर्जत-सीएसएमटी लोकलचा हा अपघात झाल्याचे त्यांना प्रथम वाटले होते.

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

या लोकल अपघातानंतर रुळावरून घसरलेले ट्रीपल इंजिन सरकार असा हल्लाबोल माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी आपल्या एक्स हॅंडलवर केली.ट्रिपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल सुरु असून त्यांना मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही,अशी टीका त्यांन केली.मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात,असा टोला त्यांनी लगावला.