उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःअनैतिक सबंध असलेल्या विवाहित मामेबहिणीने लग्नाचा तगादा लावताच तिचा व तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा आवळून नंतर डोक्यात दगड टाकून निर्घूण खून करणाऱ्या नराधमाच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यासाठी पंधरवड्यापूर्वीच पोलिस अधिक्षक (एसपी) म्हणून रुजू झालेले संदीपसिंग गिल यांची युक्ती फळाली आली.त्यामुळे ट्रिपल मर्डर मधील आरोपी पोलिसांच्या गळाला लागला.पण,त्यासाठी एक टीम म्हणून जिल्हा पोलिस दलाला काम करावे लागले.
१७ मे रोजी पुणे पोलिस दलातून बदली होताच दुसऱ्याच दिवशी गिल यांनी पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर रांजणगाव (ता.शिरुर) येथील या तिहेरी खूनाचा खळबळजनक गु्न्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांची पहिलीच पत्रकारपरिषद शनिवारी (ता.७) झाली.त्यात त्यांनी हा गुन्हा कसा युक्तीने आणि एक टीम म्हणून पुणे ग्रामीण पोलिस दलाने एकत्र येत कसा उघडकीस आणला,ते सांगितले.रांजणगाव एमआयडीसी त अर्धवट जळालेल्या तिन्ही माय़लेकरांच्या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती.ती पटवून नंतर त्यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोचण्याची पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखीच आहे.

२५ मे रोजी रांजणगाव येथे एक महिला व दोन लहान मुलांचे मृतदेह सापडले.त्यामुळे पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली. मात्र,त्यांची ओळख पटली नव्हती.महिलेच्या हातावर फक्त जयभीम गोंदलेले हाच काय तो एकमेव दुवा होता.गुन्हा गंभीर असल्याने सात दिवसांपूर्वीच पदभार हाती घेतलेल्या एसपी गिल यांनी घटनास्थळी भेट दिली.मृतांची ओळख पटविण्यासाठी सात पथके तयार केली.त्यांनी अडीचशे सीसीटीव्ही तपासले.रांजणगावसह सुपा,तळेगाव,चाकण एमआयडीसीतील तब्बल साडेसोळा हजार कामगारांची चौकशी केली.बॅंक,आशा वर्कर्स यांच्याकडे तपास केला.पण,हाती काही लागले नाही. घटनेच्या दिवशी मोठा पाऊस झाल्याने घटनास्थळी ठसेही मिळाले नाहीत.त्यामुळे एसपी गिल यांनी आपल्या हद्दीतील सर्व ३३ पोलिस ठाण्य़ांच्या गुन्हे शोध पथकातील (डीबी) आणि स्थानिक गु्न्हे शाखेच्या (एलसीबी)अंमलदारांची बैठक घेतली. त्यांची सहा पथके तयार करून ती राज्यातल्या जिल्ह्यांत पाठवली.तिकडे कोणी बेपत्ता (मिसिंग)झालेले आहेत का,याची माहिती घेण्यास सांगितले.त्यावेळी बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलिस ठाण्यात एक महिला मिसिंग असल्याचे समजले.तिचे वर्णन मृत महिलेशी जुळले.त्यानंतर ती स्वाती केशव सोनवणे (रा.वाघेरा,ता.माजलगाव) ही असल्याचे समजले.तिच्या नवऱ्याकडे केलेल्या चौकशीतून ती दोन मुलांसह आळंदी येथे तिच्या आईवडिलांकडे गेल्याचे कळले.त्यांच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांच्या हाती काही लागले नाही.तरी ते नाऊमेद झाले नाहीत.
दरम्यान,पतीशी भांडण होत असल्याने स्वाती ही तिची दोन मुले स्वराज (वय दोन वर्षे)व विराज (वय एक वर्षे)यांच्यासह तिच्या बहिणीचा दिर गोरख पोपट गोखारे (वय ३६,रा.सरदवाडी,ता.शिरुर)याच्या मोटारसायकलवर बसून आळंदी येथून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्याला ताब्यात घेऊन त्याची योग्य पद्धतीने चौकशी करताच त्याने गुन्हा कबूल केला.तो चुलत मामेबहिण असल्याने स्वाती व तिचा नवरा केशव यांची भांडणे वरचेवर सोडवित होता.त्यातून त्यांच्यात प्रेमसबंध निर्माण झाले.त्यातून लग्नासाठी स्वातीने गोरखच्या मागे तगादा लावला.त्यामुळे तिचा काटा काढण्याचे त्याचे ठरविले.२३ तारखेला तो तिला तिच्या मुलांसह आळंदी येथून आपल्या घराच्या दिशेने सरदवाडीला बाईकवरून घेऊन निघाला.पुणे-नगर रस्त्यावर मध्येच रांजणगावात त्याने बंद पडलेल्या ग्रोवेल कंपनीजवळ खंडाळे गावाकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर गाडी थांबवली.तेथे तिघांचा गळा आवळून त्याने खून केला.नंतर त्यांच्या डोक्यात दगड टाकले.एवढेच नाही,तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने गाडीतील पेट्रोल तिघांवर टाकून ते जाळण्याचा प्रयत्नही केला होता.त्याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठ़डीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

