आयुक्त महेशदादांपुढे पुन्हा माघार घेणार,मोशीतील कत्तलखाना रद्द करणार?

चिखलीचा टीपी रद्द,चऱ्होलीचा स्थगित,मोशीच्या कत्तलखान्याचे काय होणार?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःचिखली आणि चऱ्होलीचा टीपी तयार करताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने स्थानिक भूमीपूत्र आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला.स्थानिक आमदार भोसरीचे महेशदादा लांडगे हे त्यांच्यामागे उभे राहिले.त्यांनी प्रशासनाला ललकारले.परिणामी चिखलीचा टीपी रद्द झाला,तर चऱ्होलीचा तो स्थगित करण्याची पाळी प्रशासनावर आली.त्यानंतर जाहीर झालेल्या डीपी त अगोदरच शहराच्या कचरा डेपोमुळे त्रस्त असलेल्या मोशीकरांच्या माथी कत्तलखाना मारण्यात आला.त्यामुळे चिखली,चऱ्होलीनंतर आता मोशी ग्रामस्थ संतापले असून त्यांनी आपल्या इथे होणाऱ्या या प्रस्तावित कत्तलखान्याला कडाडून विरोध केला आहे.त्यांच्यामागेही आ.महेशदादा ठाम उभे राहिल्याने प्रशासन हा कत्तलखानाही चिखली टीपी सारखा रद्द करण्याची दाट शक्यता आहे

शहराच्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) मोशीमध्ये कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!असे आ.महेशदादांनी मोशीकरांना काल आश्वस्त केले.तशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली.त्यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कत्तलखाना नाही,तर गोशाळा होईल,असे आश्वासन दिले.पिं.चि.मनपाच्या नवीन डीपी त मोशी येथे कत्तलखाना प्रस्तावित आहे.त्याला स्थानिक नागरिक,भूमिपुत्र आणि सकल हिंदू समाजाचा तीव्र विरोध केल्याने या आरक्षणात बदल करुन तेथे गोशाळा उभारण्याची आग्रही भूमिका आ. महेशदादांनी घेतली आहे.दरम्यान,मोशी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काल शेखरसिंह यांची भेट घेतली.गावात कत्तलखाना सुरू केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा हा निर्णय असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.तेथे गोशाळा करण्याची मागणी केली.श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू यांच्यामध्ये मोशी असून, वारकरी सांप्रदाय या भागात मोठ्या असल्याने हे आरक्षण रद्द करावे,अन्यथा वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत.
त्यावर तसेच आ.महेशदादांच्या मागणीनुसार मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द करून तेथे गोशाळा आरक्षण करण्याचा प्रस्ताव सबंधित कमिटीसमोर ठेवला जाईल,असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने नंतर सांगण्यात आले.

आळंदी देवस्थान पदाधिकाऱ्यांसह मोशी ग्रामस्थांचाही कत्तलखान्याला विरोध केला आहे,याकडे आ.महेशदादा यांनी लक्ष वेधले.डीपीची आखणी करणाऱ्या समितीने कत्तलखान्यासाठी वेगळी जागा निश्चित करायला हवी होती,असे ते म्हणाले.हा डीपी प्लॅन हा अद्याप अंतिम झालेला नसल्याचे सांगत कत्तलखाना हा
मोशीत होऊ देणारच नाही,असा टीपी विरोधासारखा कडक इशारा त्यांनी दिला.एवढेच नाही,तर वारकरी सांप्रदाय व तमाम हिंदू बांधवांच्या मागणीप्रमाणे मोशी तेथे कत्तलखान्याऐवजी गोशाळा सुरू करण्यबाबत प्रशासनाकडे भूमिका मांडली आहे,असे ते म्हणाले.