पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी थोडं गढूळ होणे हे सर्वत्र स्वाभाविकच आहे
प्रतिनिधी पिंपरीः
गेल्या काही दिवसांपासून गढूळ,अशुद्ध आणि चव बदललेले पाणी येत असल्याच्या तक्रारी संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधून येत आहेत.त्यामुळे अखेर पिंपरी चिंचवड महापालिका व त्यांच्या पाणीपुरवठा विभागाला आज लेखी खुलासा करावा लागला.चव बदलली असली तरी पाणी पिण्यायोग्यच असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी थोडं गढूळ होणे हे सर्वत्र स्वाभाविक आनागरिकांनी घाबरून न जाता पाणी उकळून वापरावे,असे आवाहन या विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.
गढूळ पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागात विशेष लक्ष देण्यात येत असल्याचा निर्वाळा महापालिकेने आज दिला.पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला, सांडपाण्यासह इतर कचरा वाहून येतो. त्यामुळे ते पाणी काही प्रमाणात गढूळ होते. मात्र महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये WHO व CPHEO च्या नियमांप्रमाणे त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते.त्यानंतरच त्याचे वितरण होते.त्याची चव व वास बदललेला जाणवत असला तरी ते पाणी पूर्णतः पिण्यायोग्य आहे, असे स्पष्टीकरण पाणी पुरवठा विभागाने आज दिले. तसेच पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे,असे आवाहनही केले.शहराला
मावळातील पवना व आंद्रा धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र पावसाळ्यातील चार महिने धरणातील साठा न वापरता नदीतील पाण्याचा वापर होतो.त्याचा परिणाम पाण्याच्या चव व वासावर किंचित प्रमाणात होतो,असा खुलासा त्यांनी केला.योग्य प्रक्रिया केलेले व स्वच्छ पाणी देण्यात येत असल्याचा पुनरुच्चार महापालिका प्रशासनाने आज पुन्हा केला.तसेच गढूळ पाण्याच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन उपाय योजले जात असल्याचा दावाही केला.तरीही ज्या भागात गढूळ पाणी येत आहे,तेथील नागरिकांनी स्थानिक पाणीपुरवठा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले आहे.

