आमदार लांडगेंनी सज्जड दम भरताच चिखली.चऱ्होली टीपी प्लॅन रद्दसाठी प्रशासन झाले सकारात्मक

 

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजित चिखली-चऱ्होलीतील शहर विकास (TP)आराखड्याला स्थानिक आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनी तीव्र विरोध करीत त्याला स्थगिती देण्याची मागणी महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे ३ मे रोजी केली होती.त्यांनतर त्यांनी काल (ता.८) या विषयावर कुठलीही तडजोड नाही असे पु्न्हा सुनावत भूमिपुत्र व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही परिस्थितीत ही TP Scheme होवूच देणार नाही,असा सज्जड दमवजा इशारा महापालिका प्रशासनाला दिला होता.त्यानंतर प्रशासन वरमले असून शेखरसिंह यांनी आज (ता.९) हा टीपी रद्द करण्याचे संकेत दिले.तसं झालं,तर ते आ.लांडगेच्या भुमिकेचे यश आणि भूमिपुत्र आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा असणार आहे.

आयुक्त परदेश सहलीवर असतानाच आ. लांडगे यांनी या टीपीला स्थगिती देण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते.ते परत येताच त्यांच्याबरोबर शुक्रवारी आ.लांडगेंनी तीन तास मॅरेथॉन बैठक या विषयावर घेतली.यावेळी त्यांनी ग्रामस्थ,भूमिपुत्रांची भूमिका ठामपणे मांडली.शहराच्या स्थापनेपासून 3- 4 वेळा भूमिपुत्रांच्या जमिनींचे शासनाने भूसंपादन केले.1970 च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने (एमआय़डीसी)उद्योगधंद्यांसाठी ते झाले.त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करुन विरोध असताना पु्न्हा दुसऱ्याांदा जमिनी ताब्यात घेतल्या.टाटा मोटर्स कंपनीच्या विस्तारासाठी तिसऱ्यांदा भूसंपादनाची कारवाई झाली.या प्रत्येकवेळी भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या भागात टीपी स्कीम लागू नये, असा पुनरुच्चार आ. लांडगे यांनी पुन्हा आयुक्तांसमोर केला.त्यावर आयुक्तांनी सदर प्रस्तावित टीपी रद्द करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आ.लांडगे यांनी या बैठकीनंतर दिली.भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही,असा शब्द देत मी कायम त्यांच्या सोबत आहे,असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान,या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे प्रचंड असंतोष असलेल्या चिखली आणि चऱ्होली ग्राामस्थांचे लक्ष लागले होते.
————