उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः नशेत कसले कृत्य वा गुन्हा होईल याचा नेम नसतो.अशाच तीन दारुड्या मुलांनी (बालगुन्हेगार) शेजारी दारु पित असलेल्या एका व्यक्तीकडे सिगारेट व माचीस मागितली.ती न दिल्याचा राग येऊन या त्रिकूटाने त्याचा कोयत्याने खूनच केला.चिखली येथे काल (ता.८) ही खळबळजनक घटना घडली.चिखली पोलिसांनी काही तासातच हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला.तीन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.यानिमित्ताने खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात बाल गुन्हेगारांचा वाढत चाललेला सहभाग ही पोलिसच नाही,तर समाजाच्या दृष्टीनेही चिंतेची बाब झाल्याचे अधोरेखित आले.तसेच बालगुन्हेगारांचे वय कमी करण्याची मागणी किती गरजेची आहे,हे ही त्यातून दिसले.
७ तारखेच्या रात्री हा प्रकार झाला.८ तारखेला सकाळी तो उघडकीस आला.त्यात महेश शिवाजी चामे (वय ३७,रा.नवचैतन्य हौसिंग सोसायटी,मोरेवस्ती,चिखली,मूळचा रा. लातूर) या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावणाऱ्याचा हकनाक बळी गेला.तो आणि आरोपी तीन बालगुन्हेगार हे परवा रात्री शऱदनगर,चिखली येथे दारु पित बसले होते. मद्यपान केल्यानंतर या तीन मुलांना धूम्रपान करण्याची हुक्की आली.म्हणून त्यांनी शेजारी दारु पित बसलेल्या चामे यांच्याकडे सिगारेट व माचीस मागितली.परंतू,लहान मुले असल्याने ती देण्यास चामेने नकार दिला.त्यावरून त्यांच्यात वाद झाला.त्या भांडणात या त्रिकूटाने चामेंवर थेट कोयत्याने हल्ला केला.त्यात तो जागीच गतप्राण झाला.
या खूनाच्या दिवशीच गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात अव्वल ठरल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चिखली पोलिस ठाण्याचा गौरव केला होता.त्यामुळे त्यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला (डीबी) कामाला लावले. त्यांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटवली.सीसीटीव्ही तपासले.घरगुती वादातून हा प्रकार न झाल्याची खात्री केली.त्यातून त्यांनी हा खून सराईत गुन्हेगारांनी केल्याचे शोधून काढले.ते मोरेवस्ती येथे लपल्याची टीप डीबी चे हवालदार चेतन सावंत आणि शिपाई संतोष सपकाळ यांना मिळाली. त्याआधारे डीबीचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे व पथकाने तेथे जाऊन या तीन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले.ते सराईत असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
—————-

