आमदारांनी धारेवर धरताच महापालिकेला आली जाग,उन्हाळ्याच्या शेवटी सुरु केले पाणीटंचाईवरील उपाय

उत्तम कुटे
पिंपरीःशहरातील पाणीटंचाई गंभीर झाल्याने चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी नुकतीच (ता.३) चिंचवडगावात पाण्याच्या टाकीखालीच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले.त्यानंतर उशीरा जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईवरील उपायांबाबत गुरुवारी (ता.८) निवेदन काढले. उन्हाळा संपत आला असताना त्यांनी पाणीटंचाईवर मात कऱण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरु केल्या.हे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासाऱखे झाले.दुसरीकडे भाजप शहरात सत्तेत मार्च २०१७ ला प्रथमच सत्तेत आल्यानंतर २५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु झालेला दिवसाआड पाणीपुरवठा गेल्या साडेपाच वर्षापासून अद्याप कायम आहे.

पाणीटंचाईवरील प्रशासनाचा तातडीचा एक उपाय भलताच जहाल आहे.येत्या दोन महिन्यात ते कोणालाही नव्याने पाण्य़ाची जोडणी देणार नाहीत.त्यापेक्षा बांधकामांना होत असलेला पिण्याच्या पाण्याचा वापर थांबवून तेथे एसटीपीतून बाहेर पडणारे पाणी वापरणे बंधनकारक करणे जरुरीचे आहे.पण,ते न करता थेट नळजोडच न देण्याचे पाऊल त्यांनी उचलले आहे.मोटारीव्दारे पाणी खेचणाऱ्यांवर ते आता कारवाई करणार आहेत.खरं म्हणजे ती वर्षभर करण्याची गरज असताना आता पाणीटंचाई निर्माण झाल्यावर ती करणे म्हणजे उशीराचे शहाणपण आहे.गाड्या,रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाणी वापरण्यास आता बंदी घातली आहे. दुसरीकडे वाहने व रस्ते धुण्यासाठी सर्रास पिण्याचेच पाणी वापरले जात आहे.पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा जावईशोध महापालिका प्रशासनाला आज लागला.लोकसंख्या गेल्या १४ वर्षात दुप्पट झाली असून पाणी पुरवठ्यात मात्र ३५ टक्केच वाढ झाल्याचे कारणही त्यांनी पाणीटंचाई तथा दिवसआड पाणपुरवठ्यावर दिले.मग,शेजारच्या पुणे शहराची लोकसंख्या या कालावधीत तेवढीच वाढली असताना तिकडे का नाही दिवसाआड पाणी हा प्रश्न कर भरणाऱ्या जनतेचा आहे.वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीच नाही,तर इतर नागरी सुविधांचा विचार करून त्याची पूर्तता करणे हे महापालिकेचे काम नाही का,असा प्रश्न सुजाण नागरिक विचारीत आहेत.आपल्या अकार्यक्षमतेची कबुली देताना अनधिकृत नळ कनेक्शन वाढल्याचे प्रशसनाने आज सांगितले.या पाणीचोरीला ती न रोखणारे प्रशासनच जबाबदारच आहे.जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणी साठा धरणात शिल्लक राहिल्याने आता जाग येऊन त्यांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत.हे करा आणि हे करू नका असे आवाहन जनतेला त्यांनी आज केले.आता पाणी जपून वापरा असे आवाहन केले.खरं म्हणजे ते नेहमीच जपून वापरण्याची गरज असताना आता त्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा त्यांनी देणे हे उशीरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल.
——————

mostbet