उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)पुणे यूनीटने पाच एप्रिलला पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील भोसरी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२)हिला पोलिस ठाण्याच्या आवारातच एक हजाराची लाच घेताना अटक केली होती.त्यानंतर दहा दिवसांतच शहर पोलिस दलात मंगळवारी (ता.१५) त्यांनी दुसरा ट्रॅप केला. पिंपरी पोलिस ठाण्याताील पोलिस उपनिरीक्षक तथा फौजदार (पीएसआय) निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८)याला तीस हजार रुपयांची लाच घेताना मोहननगर पोलिस चौकीतच पकडले.त्यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली.लाचखोर बोकेफोडेला पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे हे निलंबित करण्याची शक्यता आहे.
५ तारखेला लाच घेतल्यानंतर नाईकरेने पळ काढला होता.मात्र,एसीबीच्य्या पथकाने तिचा पाठलाग करून भोसरी पोलिस ठाण्यापासून काही किलोमीटरवर पिंपरी न्यायालयाच्या बाहेर तिला पकडले होते.एसीबीने नेहमीपेक्षा या प्रकरणात चपळ कारवाई केली. फक्त २४ तासात तक्रारीची पडताळणी करून त्यांनी लाचेचा सापळा (ट्रॅप) यशस्वी केला.नाईकरेने दूध विक्रीचा व्यवसाय असलेल्या समर्थ डेअरी मालक तरुणाकडून ही लाच घेतली.३१ मार्चला ही डेअरी रात्री ११ नंतर सुरु होती.त्यामुळे तिने डेअरी मालकाविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई केली.खटला भरला.तो न्यायालयात न पाठविण्यासाठी आणि दंड न भरण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागितली.नंतर एक हजारावर तडजोड करीत ती आज घेतली.
नाईकरेप्रमाणेच बोकेफोडेवरही तो काम करीत असलेल्या पोलिस ठाण्यात (पिंपरी) गुन्हा दाखल झाला.त्यानेही नाईकरे हिच्यासारखीच लाचेची रक्कम नंतर कमी करून ती घेतली.आपल्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या आरोपीकडून प्रथम चाळीस हजार रुपयांची लाच त्याने मागितली.नंतर तीस हजारावर तडजोड करून चौकीतच ती घेण्याचे धाडस केलं. त्याने सदर आरोपीविरुद्धच्या गुन्ह्यात त्याला मदत करण्यासाठी आणि त्याचे जप्त केलेले वाहन सोडवून देण्यासाठी ही लाच मागून ती घेतली.

