उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सीमेवर मुळा नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली सिमेंटीकरण सुरु असल्याने त्याला पर्यावरणवादी संघटनांच्या नदी बचाव शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.१५) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच विरोध प्रगट केला.हे नदीकाठचे काँक्रीटीकरण पुर येण्यास कारणीभूत ठरणार असल्याने ते थांबवण्याची मागणी त्यांनी केली.पिंपरीकर विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ही भेट झाली.त्यावर महापालिका आणि जलसंपदा विभागाची तातडीने बैठक घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हे नदी प्रदूषण रोखणारे नाही,तर तिचे कॉक्रींटीकरण करून पुराला आमंत्रण देणारे काम थांबवणाार का,याकडे लक्ष लागले आहे.
पूर थांबेल अशा प्रकारे नद्या स्वच्छ कऱण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली.नदी सुधारच्या नावाखाली मुळा नदीपात्र अरुंद केले जात असून त्यास त्यांनी कडाडून विरोध केला.यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन पुरस्थिती निर्माण होईल,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.या शिष्टमंडळात आ.गोरखे,ज्येष्ठ पर्यावरणवादी धनंजय शेडबाळे,जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, सामाजिक कार्यकर्ते बाबा भोईर, पिंपरी- चिंचवड सिटीजन फोरमचे तुषार शिंदे आदींचा समावेश होता.नदी सुधारमुळे ३८ टक्के नदीपात्र अरुंद होणार असूनही महापालिका हा प्रकल्प रेटत आहे,याकडे आ. गोरखेंनी लक्ष वेधले.तर,शहरातील ४६ विविध संस्थांच्या वतीने मुळा नदीवर सुरू असलेले काँक्रीटीकरण थांबवा आणि फक्त मुळा नदी नव्हे तर पवना आणि इंद्रायणी नद्यासुद्धा उगम ते संगम स्वच्छ करा,अशी मागणी फडणवीसांकडे केल्याचे शेंडबाळे यांनी सांगितले.

