खेड जिल्हा सत्र न्यायालयातील वकीलच नाही,तर पक्षकारही …या कारणामुळे आहेत त्रस्त

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः तारीख पे तारीखमुळे वर्षानूवर्षे खटले प्रलंबित राहणे,परिणामी निकाल लवकर न येऊन न्याय मिळण्यास उशीर होणे अशा अडचणींना सर्वच न्यायालयातील पक्षकारांना सध्या सामोरे जावे लागते आहे.पण,याजोडीने त्यांना तसेच वकिलांनाही खेड जिल्हा सत्र न्यायालयात दुसऱ्याच एका नागरी समस्येने सध्या खूप त्रस्त केले आहे. या न्यायालयाच्या आवारात डुक्करांचा सुळसुळाट झाल्याने वकिलांबरोबर पक्षकारही वैतागले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी)या प्रश्नाकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप वकिलांच्या स्थानिक संघटनेने केला आहे.त्याबाबत वारंवार तक्रारी करुनही त्याची दखलच घेण्यात आली नसल्याचे खेड तालुका बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड.वैभव कर्वे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला सांगितले.या अगोदरच्या अध्यक्षांनीही या समस्येचा पाठपुरावा केला,पण त्याला यश आले नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले. आमच्याकडे मनुष्य़बळ नाही,असे सांगून पीडब्लू़डीचे लोकं आपली जबाबदारी झटकत आहेत,असे ते म्हणाले.

शहराच्या मध्यवर्ती भागात हे न्यायालय आहे.येथून हाकेच्या अंतरावर नगरपरिषद कार्यालय,तहसीलदार,पोलिस उपअधिक्षक कार्यालय आहे.या परिसरात अस्वच्छता आहे.त्यात सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असून ते अंतिम टप्यात असल्याने त्याचा राडारोडा तेथे पडलेला आहे.त्यामुळे डुकरांचा तेथे मुक्त वावर आहे.त्यातून या न्यायालयीन पवित्र वास्तुच्या आवाराला काहीसे ओंगळ स्वरुप येऊन ते आणखी अस्वच्छ झाले आहे.त्यामुळे रोगराईही पसरण्याची भीती व्यक्त करीत हा उपद्रव त्वरित थांबविण्याची मागणी वकील वर्गाने केली आहे.