कुविख्यात दरोडेखोर टोळीत एक अल्पवयीनही,अहिल्यानगर जिल्ह्यातून येत चाकण परिसरात टाकत होते दरोडे

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः चाकण परिसरात दरोडे टाकणारी अहिल्यानगर जिल्ह्यातील कुविख्यात दरोडेखोर टोळीच्या चाकण पोलिसांनी मुसक्या आवळल्या.लुटीचे १२ लाखांचे सोने व इतर ऐवज असा १५ लाखांचा लुटलेला मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.आश्चर्याची बाब म्हणजे या टोळीत एक बालगुन्हेगार आहे.बालगुन्हेगारीचा मुद्दा यामुळे पु्न्हा ऐरणीवर आला.कारण खूनासह दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग स्पष्ट झाला.

चाकण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी.)ही कामगिरी केली.त्यांनी १५ दिवस अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात तळ ठोकून या चंदर टोळीच्या मुसक्या आवळल्या.त्यात सातजण असून ते श्रीगोंदा तालुक्यातील आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या तीन दुचाक्या,तलवार,पालघन,कटावणी,चाकू,खुट्टा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.त्यांना आश्रय देत लपवून ठेवणारा एका दरोडेखोराचा दाजी गणेश शिवाजी काळे आणि त्यांच्याकडून चोरलेले सोने विकत घेणारा सोनार अभय विजय पंडीत (दोघेही रा.श्रीगोंदा तालुका) यांनाही पोलिसांनी पकडले.सचिन चंदर भोसले,परश्या गौतम काळे,भीमा आदेश काळे,धंग्या चंदर भोसले,राजेश अशोक काळे,अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे आणि विधीसंघर्षित बालक म्हणजे बालगुन्हेगार यांचा या टोळीत समावेश होता.ती रात्री दरोडे टाकत होती.तसेच घऱफोड्याही करीत होती.एकट्या चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दोन दरोडे टाकून तीन घरफोड्या केल्या होत्या.

यावर्षी २४ फेब्रुवारीला रात्री दीड वाजता त्यांनी बहूळ (ता.खेड) येथील जयराम लक्ष्मण वाडेकर यांच्या घरावर दरोडा टाकला.घरातील व्यक्तींना चाकू,तलवार व दांडक्याने मारहाण करीत एक लाख ३२ हजाराचा ऐवज लुटला होता.याच टोळीने शेल पिंपळगाव (ता.खेड) येथील अनिकेत दौंडकर यांच्या घरावरही दसऱ्याच्या दिवशी असाच सशस्त्र दरोडा टाकला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली.तसेच चाकण पोलिसांना या गुन्ह्याचा तातडीने शोध लावण्यास सांगितले होते.आरोपींनी कसलाच मागमूस मागे ठेवला होता.तरी पोलिसांनी खबऱ्या्ंच्या माहितीला तांत्रिक विश्लेषणाची जोड देत या टोळीचा माग काढला.त्यासाठी १५ दिवस ते बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तळ ठोकून राहिले. आरोपींचा मुसक्या आवळल्या.पण,ते सराईत असल्याने तोंड उघ़डायला तयारच नव्हते.मग,मात्र पोलिसांनी आपला परंपरांगत खाक्या दाखवला.त्यानंतर दरोडेखोर घडाघडा बोलू लागले.वरील दोन दरोडेच नाही,तर इतर तीन घरफोड्यांचीही कबुली दिली.या कामगिरीबद्दल चाकण पोलिसांचा पोलिस आयुक्तांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.