मुंबई-गोवा रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते.
देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल. चीनमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट ८ टक्के आहे. युरोपातील देशांत ११ टक्के आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट सध्याच्या दोन अंकी म्हणजेच जवळपास १६ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर येत्या जानेवारीपर्यंत आणली जाईल, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी पुढील दोन वर्षात नॅशनल हायवेचे रस्ते जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल असा आशावाद व्यक्त केला.

