उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःबदलापूरच्या शाळकरी अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर तथा चकमक ही बनावट असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच काढल्याने हे प्रकरण पोलिसांवर शेकले.त्याची चर्चा सुरु असतानाच बीडचा वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक (फौजदार)रणजित कासले याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर आपल्यला होती,असा खळबळजनक दावा सोमवारी व्हिडीओतून केल्याने मोठी खळबळ उडाली.तसेच त्यामुळे पोलिसांचे एन्काऊंटर हे खरंच नकली तथा बोगस असतात का या चर्चेने पुन्हा मूळ धरले.त्यामुळे कासलेच्या दाव्यात किती तथ्य हे जाणून घेऊयात.
कासलेचे यापूर्वीचे काही व्हिडीओ हे त्याने नशेत केल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहे.त्यामुळे तो खरे बोलत असला,तरी त्याच्या बोलण्याची गत ही लांडगा आला रे लांडगा आला…या गोष्टीसारखी झाली आहे.त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही.त्याला काही कारणे आहेत.पोलिस सेवेतून त्याला निलंबित करण्यात आल्यानंतर त्याने एन्काऊंटरवर हे भाष्य केलं आहे,पहिला मुद्दा.त्यामुळे कराडला चकमकीत ठार मारण्याची कोटींची सुपारी मिळाली होती,या त्याच्या दाव्यावर कोणी पटकन विश्वास ठेवेल,असे वाटत नाही.दुसरा मुद्दा म्हणजे तो स्वत वादग्रस्त असून वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये जाऊन तेथील एका व्यापाऱ्याकडून त्याने खंडणी उकळली.म्हणून त्याला निलंबित करण्यात आले आहे.त्यामुळे तो पोलीस खात्यावरील आकसापोटी सस्पेंशननतर हे आरोप करीत असावा,यात तथ्य असू शकते.तर,त्याच्या दाव्यात ते नसण्याचेही ते कारण बनू शकते.तिसरं महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे चकमक ही फक्त काही खास चकमक फेम पोलिस अधिकारीच करतात.ज्यांना गोळीबाराचा सराव असतो,ज्यांचा नेम अचूक असतो.असे हे निडर अधिकारी सहसा गुन्हे शाखेतच असतात.कासले हा सायबर सेलला होता.त्या शाखेत काहीसे तांत्रिक कौशल्य लागते.तेथील पोलिस अधिकारी, कर्मचारी हे तुलनेने सायबरच्याच कामात तज्ज्ञ म्हणजे हुषार असतात.एन्काऊंटर या फिल्डवरील कामात ते तेवढे माहिर नसतात.त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे ध़़डाकेबाज अधिकारी सोडून कासलेला कोणी एवढी मोठी एन्काऊंटरची सुपारी देईल,असे वाटत नाही.
तिसरं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहसचिवांची बैठक होऊन त्यात एन्काऊंटरचा निर्णय होतो,हा कासलेचा दावा सुद्धा न पटणारा आहे.एकतर,हा निर्णय एवढ्या वरिष्ठ पातळीवर कधीच घेतला जात नाही.दुसरं म्हणजे आता भाजपच्या राजवटीत अशा निर्णयांना परवानगी मिळू शकते.पण,सर्वाधिक चकमकी या मुंबईत भाजपची राज्यात सत्ता नसताना झाल्या आहेत.त्यांना त्यावेळच्या कॉंग्रेस सरकारने नक्की परवानगी नाकारलीच असती.त्यावेळी संघटीत गुंड टोळ्यांनी मुंबईला जणू काही काळ ओलिस धरल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.परिणामी शाही विवाह सोहळे थांबले होते.श्रीमंत लक्झरी मोटारी ऐवजी छोट्या गाड्यातून कधी खंडणीचा कॉल येईल या भीतीने फिरू लागले होते.दुसरीकडे संघटीत गुंडटोळ्यांतील संघर्ष शिगेला पोचला होता.त्यामुळे खंडणीराज आणि टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एन्काऊंटरचा हुकमी पान बाहेर काढले.स्थानिक पातळीवर म्हणजे पोलिस आयुक्त लेव्हलवर हा निर्णय झाला. मुख्यमंत्री तथा राज्य सरकारची त्याला मूक संमती असू शकते.पण,त्यांच्या पातळीवर बैठक घेऊन असा निर्णय होणे शक्य नाही.कारण त्यातून ते बनावट चकमकीच्या आरोपात फसू शकत होते.
दुसरीकडे एन्काउंटर करण्यात येणाऱ्या गुंडांची पोलिसांवर गोळ्या झाडू शकेल इतकी मजल जाऊ शकते का ,तो पिस्तूल वा रिव्हॉल्वर बाळगू शकेल,एवढा सराईत आहे का,हे त्याचा एन्काऊंटर करण्यापूर्वी पाहिले जात होते.बनावट चकमकीत सापडू नये म्हणून मुंबई पोलिस त्याबाबत खूप दक्षता आणि काळजीही घेत होते.त्यासाठी चकमकीची त्यांची एक थिअरी तथा मोडस ऑपरेन्डी नंतर काढण्यात येणाऱ्या प्रसिद्धीपत्रकातून ठरलेली अशीच होती.त्यातील माहितीनुसार एन्काऊंटरमध्ये मारला जाणारा गुंड हा आपल्या साथीदाराला भेटायला वा खंडणी उकळायला रात्री उशीरा वा पहाटे निर्जन स्थळी आलेला असायचा.त्याला शरण येण्याचे आवाहन करताच तो पोलिसांवर गोळीबार करायचा,स्वसंरक्षणार्थ पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी व्हायचा,रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तो मयत झालेला असायचा अशी ही थिअरी एकच असे. मात्र,असे एक नाही,तर दोन एन्काउंटर त्यांच्या अंगलट आले.त्यातून काही चकमकफेम पोलिस अधिकाऱी निलंबित झाले.त्यानंतरच या चकमकी बोगस असल्याची चर्चा सुरु झाली.पण,त्यात मरणारे गुंड हे त्रासदायक ठरत असल्याने मुंबईकर या आरोपावर शांत होते.कारण हे गुंड जामीनावर पुन्हा बाहेर आल्यावर खून,खंडणी,अपहरणासारखे गंभीर गुन्हे करीत होते.दुसरीकडे न्यायालय प्रक्रियेच्या विलंबामुळे एन्काऊंटर हा त्यावरील एक रामबाण उपाय त्यांना वाटत होता.
वरील कारणांमुळेच कासलेच्या दाव्यावर देशमुख प्रकरणात आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई या सुद्धा सहमत झालेल्या नाहीत.मात्र,कराडचा अक्षय शिंदे होऊ शकते,त्याला बनावट चकमकीत मारले जाऊ शकते,ही शंका त्यांना वाटते आहे.देसाई यांनी व्हिडीओव्दारे आज ती सोशल मिडीयात बोलूनही दाखवली. कासले किती खरं बोलतो हे माहिती नाही,पण कराडचा खून होऊ शकतो,अशी शंका त्यांनी व्यक्त केली.त्याला सगळी अंडीपिल्ली (कुंडली) माहिती असल्याने त्याचा मोठा आका अडचणीत येऊ शकतो,त्यातून कराडचा एन्काऊंटर नाही,परंतू तुरुंगातही आकस्मिक मृत्यू होऊ शकतो,असा संशय जाणकारांनाही वाटतो आहे.माजी मंत्री धनजंय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनीही तो व्य्कत केला. मुंडेंचे सगळे काळे कारनामे कराडला माहिती असल्याने त्याचा मृत्यू घडवून आणला जाऊ शकतो,असे त्यांनी सोमवारी सांगितले. एकूणच कासलेच्या दाव्यात तथ्य नसले,तरी कराडचा गेम होऊ शकतो,ही शक्यता अनेकांना वाटते आहे.मात्र,दुधाने तोंड पोळल्याने (अक्षय शिंदेची चकमक) राज्य सरकार आता ताकही (कराडबाबत) फुंकूनच पिणार हे,मात्र नक्की.

