उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज सहावी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा नुकतीच झाली.तिचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे व न्या.शर्मिला देशमुख यांनी केले. यावेळी न्या.देशमुख यांनी बिझनेस नाही,तर पवित्र व्यवसाय म्हणून वकिली करा,असा सल्ला विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिला.
वकिली व्यवसाय हा पवित्र व्यवसाय म्हणून करणे आवश्यक असून,तो बिझनेस म्हणून करणे उचित नाही,असे प्रतिपादन न्या.देशमुख यांनी केले.तर,न्या.मारणे यांनी वकिली प्रशिक्षणाचे महत्त्व विषद विशद केले.तसेच सोसायटीच्या शिक्षण कार्याचे कौतुक केले.प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन तसेच सुमंतराव कोल्हे,बार कौन्सिल उपाध्यक्ष ॲड.अहमदखान पठाण,सोसायटीचे उपाध्यक्ष यांनी राजेंद्र जगताप यांनीही विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड.हर्षद निंबाळकर व ॲड.राजेंद्र उमाप,जिल्हा न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.
या अभिरुप न्यायालय स्पर्धेचे न्यायाधीश म्हणून दिवाणी न्यायाधीश दीपक डोंगरे,शरद मडके,ऍड.नीलिमा वर्तक,प्रा.एस.एम.तांबोळी यांनी काम पाहिले.या स्पर्धेत पनवेल चे भागुबाई चंगू ठाकूर विधी महाविद्यालय विजेते तर,पुण्याचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय उपविजेते ठरले.शिवाजी मराठा विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी युगा कुमारी हिला सर्वोत्कृष्ट प्रतिवादी वकील,तर ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रुती चौबे हिला सर्वोत्कृष्ट वादी वकील म्हणून पारितोषिक जिल्हा न्यायाधीश डब्ल्यू.के.कनबरकर व के.बी.कटके यांच्या हस्ते देण्यात आले.ॲड.एन.डी.पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.प्रा.सिद्धकला भावसार यांनी आभार मानले.प्रा.मीनाक्षी जाधव यांनी सूत्र संचालन केले.

