रिक्षात राहिलेले पावणेसात लाखांचे गंठण प्रामाणिक रिक्षाचालक आणि पोलिसांमुळे मिळाले परत

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःसीसीटीव्हीचा उपयोग गंभीर गुन्ह्यतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना होतोच,तसाच तो गहाळ झालेला ऐवज परत मिळवण्यासाठीही होतो,याचा प्रत्यय चिखली पोलिसांनी दिला.चिखलीतील नेवाळेवस्ती येथील सौ.प्रतिभा प्रवीण काळे (वय ३५,रा.जयहिंद रेसिडेन्सी) यांचे रिक्षात विसरलेले पावणे सहा लाख रुपयांचे सात तोळे सोन्याचे गंठण प्रामाणिक रिक्षाचालक बाळू जाधव आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे परत मिळाले.गंठण असलेली काळेंची पर्स जाधव यांनी तशीच ठेवली होती. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस ठाण्यात त्यांचा आज (ता.१४)सत्कार करण्यात आला.जाधव यांच्या या प्रामाणिकपणाचे चिखली परिसरात कौतूक होत आहे.

११ तारखेला सौ.काळे या आपल्या सोसाय़टीतून चिखली गाव कमान येथे रिक्षाने कामानिमित्त गेल्या होत्या.त्यावेळी त्यांनी सावधगिरी म्हणून आपले सात तोळ्याचे मंगळसूत्र पर्समध्ये ठेवून ती त्यांनी रिक्षात सीटमागे ठेवली.पण,उतरताना त्या आपल्या बॅगशिवाय उतरल्या.नंतर त्यांना आपले गंठण असलेली पर्स रिक्षात राहिल्याचे आढळताच त्यांनी तडक चिखली पोलिस ठाणे गाठले.मात्र,त्यांना रिक्षाचा नंबर माहित नसल्याने पोलिसांना प्रथम सदर रिक्षाचा शोध घेण्यास अडचण आली.म्हणून त्यांनी त्या परिसरातील वीस सीसीटीव्ही तपासून सौ.काळेंनी प्रवास केलेली रिक्षा शोधून काढली. तिचे चालक जाधव यांना ठाण्यात बोलावून पर्सबाबत विचारणा केली. तेव्हा सदर प्रवासी ती परत नेण्यासाठी येईल म्हणून सुरक्षित ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलिसांनी ठाण्यातच सत्कार केला.