उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः शिकवणीला (क्लास) जाते असे सांगून घराबाहेर पडलेल्या ११ वी तील अल्पवयीन विद्यार्थिनीचा नंतर खून झाला.खेड तालुक्याच्या मांजरेवाडी,धर्म येथे नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे तालक्याच्या पूर्व भागात मोठी खळबळ उडाली.या प्रकरणी मांजरेवाडीतीलच नवनाथ कैलास मांजरे याला खेड पोलिसांनी आज (ता.१४)अटक केली.त्याने खूनाची कबुली दिली असल्याचे खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (पीआय )प्रभाकर मोरे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज ला सांगितले.मात्र,खूनाचे कारण अद्याप कळले नसल्याचे ते म्हणाले.
आरोपी मांजरे याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठ़डी खेड न्यायालयाने आज सुनावली.दरम्यान,प्रेमातून हा खून झाला असल्याची चर्चा आहे.राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात खून झालेली १७ वर्षीय मुलगी अकरावीत शिकत होती. ११ तारखेला ती क्लासला घरी जाते असे सांगून बाहेर पडली,ती परतलीच नाही.शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी तिला पळवून नेल्याची तक्रार त्याच दिवशी पोलिस ठाण्यात दिली.दरम्यान,दुसऱ्या दिवशी या मुलीचा मृतदेह तिच्या गावातील (वाडीतील) स्मशानभूमीत भीमा नदीच्या पात्रात मिळाला.तिच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या.त्यामुळे पोलिसांनी खूनाचे कलम गुन्ह्याला लावले.दुसरीकडे सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही मुलगी मांजरेच्या दुचाकीवर (बाईक) जात असल्याचे तिच्या चुलतभावाने शोधले.त्यामुळे पोलिसांत येऊन त्याने तसा जबाब दिला.त्यात त्याने मांजरेनेच तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला.त्यानुसार पोलिसांनी विविध पथके आरोपीच्या मागावर पाठविली.त्यातील एकाच्या तावडीत तो सापडला.प्राथमिक तपासात त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)स्नेहल गुरव पुढील तपास करीत आहेत

