पिंपरीचे आमदार बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्याने प्रशासनाला आता ऐकावे लागेल :- आ.गोरखे
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः आमदारकीची पहिलीच टर्म आणि दुसरेच अधिवेशन असलेल्या विधान परिषदेतील अमित गोरखेंनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडसह राज्यातील तब्बल १३ विषय मांडले. माध्यमांमुळे शक्य हे झाले,असे त्यांनी आज सांगितले.पिंपरी चिंचचवमध्ये विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे दोन असे पाचही आमदार महायुतीचे असून त्यातील गोरखे यांनी प्रथम आपल्या अधिवेशनातील कामगिरीचा लेखाजोगा मांडला.समाजहिताचे प्रश्न मांडले, म्हणून पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील एक आमदार,मात्र यावेळीही विधानसभेत बोलले नाहीत.
शहरातील नदी प्रदूषण,पिंपरी-चिंचवड महापालिकेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील गैरव्यवहार,अर्बन स्ट्रीट प्रकल्पातील निकृष्ट काम,माथाडी कामगारांचे प्रश्न,रेशनवरील रसायनयुक्त शिध्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात झालेली केसगळती, एसटी बसगाड्यांचे इलेक्ट्र्रीककरण आदी प्रश्न लक्षवेधी सूचना,तारांकिंत प्रश्न आदी संसदीय आयुधांचा वापर करून सभागृहात मांडले,त्याकडे सरकारचे लक्ष वेधले,असे आ. गोरखे म्हणाले.यावेळी भाजपचे शहरातील ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे, वरिष्ठ शह उपाध्यक्ष राजू दुर्गे,माजी नगरसेवक शीतल तथा विजय शिंदे, संदीप वाघेरे,सुजाता पालांडे आदी उपस्थित होते. शहरात गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी आ.गोऱखे यांनी यावेळी व्यक्त केली.माजी नगरसेवकांना प्रशासक तथा पालिका आयुक्त शेखरसिंह आणि त्यांचे अधिकारी म्हणजे प्रशासन विश्वासात घेत नसून कामे दर्जाहीन होत असल्याचे त्यांनी सांगितले.उदाहरणादाखल त्यांनी दापोडी ते निगडी या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरु असलेले अर्बन स्ट्रीट प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याकडे लक्ष वेधले.हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली.
प्रशासक राजवटीत प्रशासन सर्वसामान्यांचे ऐकत नाहीत.म्हणून त्यांचे प्रश्न आम्हाला विधीमंडळात मांडावे लागले,अशी खंत आ.गोरखेंनी व्यक्त केली.मात्र,आता शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्याने आता प्रशासनाला ऐकावेच लागेल,असे ते म्हणाले.शहरातील नदी प्रदूषणाकडे पिंपरी महापालिकेबरोबर पीएमआरडीए चेही दूर्लक्ष ही चुकीची बाब असून त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधकांनी सभागृह बंद पाडल्याने महत्वाचा वेळ वाया गेला,असा आरोप त्यांनी केला.तसेच काही महत्वाचे प्रश्न यावेळी तांत्रिक अडचणीमुळे मांडता आले नाहीत,असे ते म्हणाले.
