उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःस्टॅंड अप कॉम़ेडियन कुणाल कामरा याने नुकतेच (ता२३) मुंबईत एका क्लबमध्ये केलेल्या विडंबन काव्यामुळे संतापलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी या क्लब तथा स्टुडिओची नासधूस केली.एवढेच नाही,तर राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यावरून मोठा गदारोळ झाला.कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब करावे लागले.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे कामराच्या काव्यात शिंदेंचे थेट नाव घेण्यात आलं नव्हतं.पण, रोख हा त्यांच्याकडे होता. त्यात त्यांना गद्दार म्हणून डिवचण्यात आल्याने शिवसेना बिथरली.त्यांनी घातलेल्या गोंधळाची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली.त्याची दखल अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सने देखील आज घेतली.त्यात त्यांनी या गुंडगिरीचा समाचार घेतला.
या घटनेचे पडसाद उमटणे अद्याप सुरुच आहे.कामरा याच्याविरुद्ध शिवसैनिकांनी तक्रार दिल्याने मुंबईत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.चौकशीसाठी त्याला पोलिसांनी दोनदा नोटीस दिली.परंतू,तो अद्याप हजर झालेला नाही.एवढेच नाही,तर त्याने दुसरे गाणे म्हणत शिवसेना आणि शिंदेंनाच नाही,तर महायुती सरकारलाही आणखी डिवचले.संविधानाची प्रत हातात घेतलेला फोटो सोशल मिडियात टाकत त्याने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगितले.तसेच घटनेने दिलेल्या आधारे लढणार असल्याचे सांगून टाकले.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच कामराविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगावे लागले. महाविकास आघाडीकडून सुपारी घेऊन कामरा हे करत असल्याचा त्यांनी आणि महायुतीनेही केला.
दरम्यान,विरोधी पक्ष व त्यातही ठाकरे गट हा कामराच्या बाजूने ठाम उभा राहिला आहे.त्यांचे नेते त्याची पाठराखण करीत आहेत.आरटीआय कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी कामरा प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्यानंतर फडणवीस आणि शिंदेंना टोला लगावला. या जागतिक कारनाम्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे विशेष “अभिनंदन!”असे ट्विट त्यांनी आज केले.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाकडून शिंदेची संभावना आतापर्यंत अनेकदा गद्दार अशीच झाली असून होतही आहे.त्यावेळी,मात्र शिंदे,त्यांची शिवसेना आणि महायुतीही गप्प होती.कामराने अशी काय कमाल केली की त्याने आपल्या गाण्यात शिंदेंचे नावही घेतले नाही,फक्त ठाकरे गटासारखा गद्दार शब्द उच्चारला,पण तो शिंदे व त्यांच्या पक्षाला मोठा झोंबला.न्यूयार्क टाईम्सच्या लेखात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही कोपरखळी मारण्यात आली आहे.कारण त्यांच्या अलिकडच्या पॉडकॉस्टमध्ये त्यांनी टीका ही भारतीय लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगितले होते. तोच धागा पकडून या लेखात एका राजकीय नेत्याला फक्त गद्दार म्हटल्याने मोदींच्या मित्रपक्ष शिवसेनेने लोकशाहीच्या जागत्याला (कामरा) कसं खाली खेचलं,असा टोला लगावला आहे.विनोद तथा विडंबन हे राजकारण्यांसाठी क्षुल्लक असून मग याच प्रकरणात ते गांभीर्याने का घेतले गेले,याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले.तर,या प्रकरणानंतर कामराचे गाणं शूट झालेला स्टुडिओ तथा क्लबचे अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने लगेच पाडून टाकले,हा बुलडोझर न्याय केल्याचा दुसरा सणसणीत टोलाही त्यात मारण्यात आला आहे.
