पुरी हो गई दादा की तमन्ना उपाध्यक्षपद बैठ गये अण्णा!

राजकारणात माझं ऐकलं,तर कुणाचं किती भलं होतंय ते बघा

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची आज एकमताने निवड झाली.कारण विरोधी पक्षाने आपली ताकद पाहून या पदासाठी उमेदवारच दिला नाही.विरोधी पक्षनेतेपद मिळावे एवढेही आमदार त्यांच्याकडे नसल्याने ते मिळण्यासाठी उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी उमे्दवार दिला नसल्याचे समजले.दरम्यान,या निवडीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली.एकनाथ शिंदे यांनी बनसोडे यांच्या निवडीचे सार एका शेरमध्येच सांगितले.पुरी हो गई दादा की तमन्ना,उपाध्यक्षपद बैठ गये अण्णा!असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला.

बनसोडेंना हे पद मिळणार अशी बातमी फक्त आपला आवाज नेच सर्वात अगोदर २१ मार्च रोजी बातमी दिली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनसोडेंच्या निवडीचा प्रस्ताव मांडला.त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष अॅड राहूल नार्वेकर यांनी बनसोडेंच्या बाजूने होयच्या सभागृहातील सदस्यांच्या आवाजाची दोनदा खात्री केल्यांनतर त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. बनसोडेंनी निपक्ष,निस्पृह काम करावे,अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांना अध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. नंतर बनसोडेंना उपाध्यक्षांच्या आसनापर्यंत नेण्यत येऊन त्यावर त्यांना स्थानापन्न करण्यात आले.यावेळी सर्वांनीच तेथे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

बनसोडे उपाध्यक्ष झाल्यानंतर वरील एकच शेर ऐकवत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.सभागृहात हशा पिकविला.तर,अजित पवार यांनी सविस्तर बोलत टोलेबाजी केली.त्यानी नव्या उपाध्यक्षांचा उल्लेख बनसोडेसाहेब असा केला.ते आणि दुसऱ्यांदा मंत्री झालेले शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे दोघेही सुरवातीला पानाची टपरी चालवत होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वताच्या हिमतीवर ते इथपर्यंत पोचले असे ते कौतुकाने म्हणाले.आपण २०१९ ला अण्णाला (बनसोडे) तिकिट दिले नसते,ते आता उपाध्यक्ष पदी विराजमान झाले नसते,त्याचा किस्सा तथा गौप्यस्फोट त्यांनी केला.ते म्हणाले,`२०१९ च्या विधासभेला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली.सुलभा शिलवंत या नगरसेविकेला दिली.त्यावर अण्णांचे तिकिट कशाला कापले,असे मी त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना म्हणालो.त्यावर सगळं माझ्या संमतीने होत नाही,असे ते म्हणाले.त्यावर त्यांना मी जरा वेगळं करतोय असं सांगितलं.त्यावर त्यात माझं नाव येऊ देऊ नका,असे ते म्हणाले.त्यानंतर मी रात्री बारा वाजता पुण्याला निघालो,अण्णाला फोन केला.एक्सप्रेस वे जिथे संपतो तिथे बोलावले.तेथे त्याला एबी फॉर्म दिला आणि सकाळी ११ वाजता पहिला तो भरायला सांगितला.त्यावर शिलवंतांचं काय असे तो म्हणताच तुला काय करायचं बाकीचं?तू फॉर्म भर,असे मी म्हटलो.त्याने सकाळी ११ वाजता जाऊन पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज भरला.नंतर १५ मिनिटांनी शिलवंत आल्या.त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या पक्षाचा अर्ज आल्याचे सांगितले.अण्णा १७ हजार मतांनी निवडून आला.त्याने माझं ऐकलं,म्हणून तो आमदार झाला.आता उपाध्यक्ष झाले.त्यामुळे माझं सांगणं आहे राष्ट्रवादीच्या सदस्यांना की राजकारणात माझं ऐकलं,तर कुणाचं किती भलं होतंय ते बघा`असे ते म्हणताच सभागृहात पुन्हा हास्यस्फोट झाला.